अकोला :  काल रात्रीची वेळ... अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालूक्यात जोरदार पाऊस सुरू होता. जिल्ह्यातील पोही गावात पावसानं तर अक्षरश: रौद्ररूप धारण केलं होतं. गावाच्या दोन्ही रस्त्यावरच्या वाटा दोन नद्यांच्या पुरानं अडवल्या होत्या. पोही-मुर्तिजापूर रस्त्यावरील तापाकळी नदीला आणि पोही-हिवरा कोरडे रस्त्यावरील उमानदीला पुर आला होता. या पुरानं पोही गावातलं मुळे कुटुंबिय मात्रं चांगलंच घाबरलं होतं. कारण, घरातील पायल मुळे ही पंचवीस वर्षीय गर्भवती महिला प्रसवकळांनी अक्षरश: विहळत होती. मात्र, पुरामूळे घरचे सर्वजण 'हतबल' होते. मात्र, या संकटकाळात अकोला जिल्हा प्रशासन आणि पिंजरचं संत गाडगेबाबा आपात्कालिन शोध व बचाव पथकानं अक्षरश: या महिलेसाठी 'देवदुता'ची भूमिका बजावली. अन् यातूनच पोही गावात रात्री एक चित्तथरारक रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. हे  या गर्भवती महिलेला रेस्क्यू टीमच्या मदतीनं पुराच्या पाण्यातून सुखरूप काढत मुर्तिजापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं.  तिला पुढील उपचारासाठी आज अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. आज संध्याकाळी पाचच्या सुमारास या महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. अकोला जिल्हा प्रशासन आणि संत गाडगेबाबा आपात्कालिन शोध आणि बचाव पथकाचं दोन जीव वाचविल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 


नेमकं काय झालं काल रात्री?  


राज्यात गेला आठवडाभरापासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. पावसामुळं राज्यातील काही नद्या इशारा पातळीच्यावर तर काही नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. तर, नद्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. अशात नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अकोल्यातही अशीच एक घटना घडली आहे, पुराच्या पाण्यातून प्रवास करत एका गर्भवती महिलेला रुग्णालय गाठावं लागलं आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या पोही-हिवरा कोरडे-माना मार्गावर हा प्रकार घडला आहे.


अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येतं आहे. अनेक ठिकाणी नदीवर बांधण्यात आलेले पुल छोटे असल्याने पुलावरुन पाणी वाहत आहे. असंच काहीस जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातील पोही गावाच्या मार्गावर घडलंय. मुर्तीजापुरमध्ये येणाऱ्या हिवरा कोरडे मार्गावरील तापाकळी नदी अन् पोही-माना मार्गावर असलेल्या उमा नदीला पूर आहे. या दोन्ही मार्गावरील नदीच्या पुलावरुन पाच फुट पाणी वाहत असल्याने ये-जा करणे धोक्याचे ठरत आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास पोही गावात एका गर्भवती महीलेला तातडीने रुग्णालयात दाखल करायचं होतं. मात्र पोही-माना-मूर्तिजापुर मार्गावरील दोन्ही नद्यांना पूर असल्याने हे शक्य होत नव्हतं. त्यामुळ अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी याची माहिती मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळेंना दिली. अन् त्यानंतर सुरू झालं चित्तथरारक 'रेस्क्यू ऑपरेशन'.... 


...अन् तिला चक्क 'देवदूत'च भेटलेत 


 पायल हिच्या प्रसवकळा जसाजसा वेळ जात होता, तसतशा वाढतच होता. तिच्या वेदना पाहून बचाव पथकातील प्रत्येकानं तिला लवकरात लवकर रूग्णालयात कसं पोहोचवता येईल यादृष्टीने प्रयत्न सुरू केलेत. मात्र, दोन्ही नद्यांचं सातत्यानं वाढतच होतं. त्यानंतर जिल्हा प्रशासनातील बचाव पथकाचे तलाठी सुनिल कल्ले, तलाठी हरीहर निमकंडे, बचाव पथकाचे दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात पथकाची रेस्क्यु ऑपरेशन वाहनासह पथक पोही मार्गावर दाखल झाले. या पथकातील जवानांनी रेस्क्यु साहित्य आणून गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी कंबर कसली. अखेर एक तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या महिलेला उपचारांसाठी मुर्तीजापूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचवल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. या बचाव पथकातील सदस्यांच्या रूपानं जणू 'देवदूत'च पायलच्या मदतीला धावून आल्याची भावना तिच्या कुटुंबियांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना व्यक्त केली आहे़. 




महिलेनं दिला गोंडस बाळाला जन्म 


काल रात्री पायल मुळे यांना रेस्क्यू टीमच्या मदतीनं पुराच्या पाण्यातून सुखरूप काढत मुर्तिजापुर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं.  तिला पुढील उपचारासाठी आज अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. आज संध्याकाळी पाचच्या सुमारास या महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. अकोला जिल्हा प्रशासन आणि संत गाडगेबाबा आपात्कालिन शोध आणि बचाव पथकाचं दोन जीव वाचविल्याबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे. 


संत गाडगेबाबा आपात्कालिन शोध व बचावपथकाचा जनसेवेचा 'सेवायज्ञ' 


अकोला जिल्ह्य़ात कुठेही नैसर्गिक आपत्ती आलीय, नागरिक कुठे अडकलेय... रुग्णाला तातडीने दवाखान्यात पोहोचवायचे... अडकलेल्या वन्यप्राण्याचे 'रेस्क्यू ऑपरेशन' करायचेय... या सर्व संकटांवर उपाय फक्त आणि फक्त एकच नाव असतंय, ते म्हणजे 'गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक....अकोला जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीच्या हाकेला 'ओ देत' तात्काळ धावून जाणार्या धेय्यवादी तरूणांचा हा संच. तब्बल 19 वर्षांपुर्वी म्हणजेच 2003 मध्ये अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या पिंजर गावातल्या दिपक सदाफळे या सामाजिक विचारांनी भारलेल्या सर्वसामान्य कुटूंबातील तरूणाने लोकांना जीवन देणार्या या चळवळीची मुहूर्तमेढ रोवलीय. या चळवळीच्या जन्माला एक छोटी घटना कारणीभूत ठरलीय. दिपकच्या पिंजर गावातील एका व्यक्तीचा वेळेवर दवाखान्यात नेता आले नाही म्हणून मृत्यू झालाय. एक कुटुंब उघडं पडलंय. नेमके याच घटनेच्या अस्वस्थेतून दिपकने पुढचे आयुष्य लोकांना जीवन देण्याच्या कामात खर्ची घालण्याचा निश्चय केलाय. 


    त्याच्या या विचाराला गावातील 20 मित्रांनी उचलून धरलेय. अन् 2003 मध्ये याच विचारातून जन्म झालाय 'गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथका'चा.... दिपकच्या आयुष्यावर राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज आणि गाडगे महाराजांच्या विचारांचा मोठा पगडा. याच विचारांवर ही चळवळ चालवायची, हा विचार त्यांनी आतापर्यंत कसोशीने अन निष्ठेने जपलाय आणि पाळला आहेय. गेल्या सोळा वर्षांपासुन एक रूपयांची सरकारी मदत न घेता या पथकाने निरंतर आपला सेवायज्ञ सुरू केलाय. सदाफळे यांच्या पथकात जवळपास चार हजार तरुणांचा समावेश आहेय.ही सर्व मुलं सामान्य घरातील आहेय. यातील 230 मुलं एनडीआरएफच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित झाली आहेत. हे सारं ही मंडळी सेवाभाव म्हणून करतात. गाडीचं पेट्रोल अन त्याअनुषंगाने लागणारा खर्च कुणी दिला तरच घेतात. या लोकांकडे साधनांचा मोठा अभाव असतांना उपलब्ध साधनांमध्ये त्यांचं हे कार्य सुरू आहेय. उत्तराखंड, माळीण दुर्घटना अनेक वादळांतही त्यांनी सेवा दिलीये.  आधी वीस जणांपासून सुरू झालेल्या या चळवळीचा आता वटवृक्ष झालाय. सध्या या पथकामध्ये चार हजारांवर सेवक आहेत. त्यापैकी दोनशेवर सेवक सर्व प्रकारच्या प्रशिक्षणांनी सज्ज आहेयेत. शंभरवर सेवकांना प्रशासनाने आपत्तीव्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहेय. विशेष म्हणजे या पथकातीलजवळपास सर्वच सदस्य सर्वसामान्य घरातील शेती करणारे, मजुरी करणारे, उदरनिर्वाहासाठी स्वतःचा व्यवसाय करणारे आहेयेत. ते आपल्या दैनंदिन कमाईतला नियमीत वाटा या चळवळीला देत असतात. त्यातूनच या कामाचा खर्च भागविला जातोय.


   जीव देणं फार सोपं असतंय. मात्र, कुणाला जीवन देणं तेव्हढंच कठीण.... अकोला जिल्हा प्रशासनाचं रेस्क्यू पथक आणि दिपक सदाफळे आणि त्यांच्या पथकाचं ही जीवनदान चळवळ समाजातील चांगूलपणाचं प्रतिक आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Nanded : मरणानंतरही संपेनात माणसाच्या यातना... सेलगाच्या ग्रामस्थांचा मृतदेहावर अंत्यसंकार करण्यासाठी गुडघाभर पाण्यातून प्रवास