Ratnagiri News : सद्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. काही ठिकाणी तर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु आहे. अशातच धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुहागर तालुक्यातील वरवेली तेलीवाडीतील ग्रामस्थांना स्मशानभूमीत जाण्यासाठी चांगला रस्ता देखील नाही. मृत झालेल्यांचा अत्यंसंस्कार करण्यासाठी कंबरेभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. स्मशानभूमी लगतच्या नदीवर पूल बांधावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
वरवेली तेलीवाडीतील ग्रामस्थांना एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर अंत्यविधीसाठी नेताना नदीतील कंबरभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. स्मशानभूमीकडे जाण्यास चांगला रस्ता नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी तेलीवाडीतील नागरिकांनी केली आहे.
मरणानंतरही हाल
एकीकडे देश स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असतानाच आजही ग्रामीण भागात अनेक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. या सोयी सुविधेकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळं नागरिकांना आता मरणानंतरही हाल भोगावे लागत आहेत. गुहागर तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात कंबरेभर पाण्यातून नदी ओलांडून स्मशानभूमीकडे अंत्यविधीसाठी प्रेतयात्रा न्यावी लागत आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसून प्रेतयात्रा नेताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात स्मशानभूमीचा विकास करणे हे दूरच राहिले आहे.
नदीवर पूल बांधून मिळावा, नागरिकांची मागणी
विजेची समस्या, अडचणीच्या पायवाटा तसेच भर पावसात नदी-ओढ्यातून कमरे इतक्या पाण्यातून चाललेली प्रेतयात्रा तसेच दगड धोंड्यातून चाललेला प्रवास ही अवस्था वरवेली तेलीवाडीच्या स्मशान भूमीकडे जाताना पाहावयास मिळत आहे. वरवेली तेलीवाडीच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं नागरिकांना दगड गोटे तुडवीत, नादुरुस्त रस्त्यावरुन, जंगल भागातून प्रेत यात्रा न्यावी लागत आहे. मृत्यूनंतरही मरण यातना नागरिकांना भोगावी लागत आहेत. अशा एकंदरीत परिस्थितीमुळं लोकांना जिवंतपणीच मरणाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळं वरवेली तेलीवाडीच्या स्मशानभूमीलगत असणाऱ्या नदीवर पूल बांधून मिळावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पायवाटा तसेच रस्ते त्याची शासन दप्तरी नोंद नसल्यानं रस्त्याच्यामध्ये येणारे नदी-ओढे याच्यावरती पूल बांधण्यात शासकीय नियमांचे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रेत नेताना नदी ओढ्यातून जावे लागत आहे.
महत्वाच्या बातम्या: