Nagpur : गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार कर काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. परिणामी विदर्भातील पाणी साठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. मात्र सोमवारी सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पुढील चोवीस तासांत अचानक पूर स्थिती (Flash Flood Risk) निर्माण होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या पत्रकात त्यांनी ही माहिती दिली.


विदर्भातील गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात आज, सोमवारी आणि मंगळवारी रेड अलर्ड जारी करण्यात आला आहे. तर नागपूर (Nagpur) आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरात सकाळपासून आकाशत काळे ढग दाटून होते. रविवारीही दिवसभरात फक्त तासभराची विश्रांती देऊन पावसाने धो-धो धुतले. नागपुरात झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमधील घरात पाणी शिरले तर सिमेंटरोडवरही तासंतास पाणी साचले होते.


चंद्रपूर जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु


सततच्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील नलेश्वर, चंदई, चारगाव आणि आणि लभानसराड हे मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. चंदई आणि चारगावमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या इरई धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. इरई धरण सध्या 95 टक्के भरले आहे. त्यामुळे इरई धरणाचे दरवाजे उघडल्या जाऊ शकतात. प्रशासनाकडून इरई नदीच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात अजूनही पावसाची  संततधार सुरु असली, तरी पावसाचा वेग अतिशय मंदावला आहे. हवामान खात्याने देखील चंद्रपूर जिल्ह्यासाठी 11 आणि 12 जुलै साठी दिलेला रेड अलर्ट आता ऑरेंज अलर्ट मध्ये बदलला आहे.


वाचा Gujarat Flood: गुजरात माॅडेल पाण्यात, अहमदाबादसह 6 जिल्हे महापुराने तुंबले, आतापर्यंत 61 जणांचा बळी, हजारो बेघर


21 गावांना सतर्कतेचा इशारा


नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी (Parshivni) तालुक्यातील 21 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खाप्याजवळील खेकरा नाल्याची दोन गेट उघडले. परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील पावसाचे पाणी खेकरा नाला प्रकल्पात येते. गेट उघडले की पाणी पुढे परशिवनीला जाते. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे. कळमेश्वरला (Kalmeshwar) ही काही ठिकाणी गावाच्या वेशीवर नाल्याचे पाणी घरांमध्ये आणि गोठयांमध्ये घुसले. तर काही गायी वाहून गेल्याचीही प्राथमिक माहिती आहे.


वाचाः Marathwada and Vidarbha Rain : मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत