अहमदनगर: जिल्ह्यात सध्या नागरिकांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात दुष्काळ (Drought) परिस्थिती निर्माण झाली असून सहा - सहा दिवस पाणी येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात 312 टँकर ( Water Tankers) सुरु करण्यात आले आहेत. 


नगरमध्ये सर्वाधिक 99 पिण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत. मात्र, पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील पाच-पाच दिवस येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 291 गावांत आणि 1544 वाड्या वास्त्यावरील 5 लाख 70 हजार लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 


दरम्यान गेल्या दीड महिन्यापासून निवडणुकीत व्यस्त असलेल्या प्रशासनाने आता पाणी पुरवठ्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. पाण्याची टंचाई एवढी जाणवत आहे की, पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील नागरिकांनी पाण्यासाठी (Drinking Water) थेट तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले. दरम्यान प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने नागरिकांनी हे आंदोलन मागे घेतले.


जिल्ह्यात पाण्याचे किती टँकर्स


संगमनेर - 27 टँकर
अकोले - 5
कोपरगाव - 3
नेवासा - 3
नगर - 29
पारनेर - 34
पाथर्डी - 99
शेवगाव - 11
कर्जत - 42
जामखेड - 23
श्रीगोंदा- 9 टँकर 


सोलापूरातील सीना नदी कोरडीठक्क


राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसत असताना सोलापूर जिल्हा मात्र तहानलेला आहे. पाण्याच्या संकटामुळे सोलापूर शहराला पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा तर अक्कलकोटमध्ये तब्बल पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. मोहोळ तालुक्यातील सीना नदीचे पात्र पूर्णपणे कोरडं झालंय.


राज्यातील धरण आणि तलावांमधील पाणीसाठा आटला


गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात उन्हाचा कडाका वाढल्याने विविध भागांमधील पाणीसाठा वेगाने आटत आहे. अनेक धरणांमधील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. पुढील काही दिवस पुरेल, इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे आता सर्वांना मान्सूनचे वेध लागले आहेत. मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर रुप धारण करु शकते.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्येही फक्त 15 टक्के पाणीसाठा उरला आहे. तीव्र उन्हामुळे तलावांमधील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाणीसाठा वेगाने आटत चालला आहे.


आणखी वाचा


करपणाऱ्या पिकांना आधी टँकरने पाणी; आता अवकाळीमुळं शेतात सचलेलं पाणी मोटरपंपाने काढण्याची नामुष्की


मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट? पाणी जपून वापरा! मुंबईत गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा