Vidarbha Unseasonal Rain : हवामान विभागाने (IMD) देलेल्या इशाऱ्यानुसार नागपूरसह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना अवकळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. राज्यात एकीकडे पाणीटंचाईचे भीषण सावट असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची दाणादान उडवल्याचे चित्र आहे. तर आगामी काळात अवकाळी पावसाचे हे ढग आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


अशातच, या अवकळी पावसाचा सर्वाधिक फटका हा भंडारा जिल्ह्यातील (Bhandara News) धान पिकांनाही बसल्याचे चित्र आहे. रणरणत्या उन्हात करपणाऱ्या ज्या धान पिकांना मोटरपंपानं पाणी देत जीवंत ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करत होते, आज त्याच शेतकऱ्यांना शेतात अवकाळी पावसामुळे साचलेले पाणी मोटरपंपाने काढून भातपीक वाचविण्याची नामुष्की ओढवली आहे.


शेतात सचलेलं पाणी पंपाने काढण्याची नामुष्की


भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील प्रल्हाद पाटील हे भातपीक उत्पादक शेतकरी आहेत. पाटील यांनी उन्हाळी भात पिकाची लागवड केली आहे. उन्हाची प्रखरता आणि पाण्याविण्या करपायला लागलेल्या भात पिकाला वाचविण्यासाठी त्यांनी मागील अठवड्यापर्यंत शेतातील भातपीक वाचविण्यासाठी मोटरपंप लावून सिंचन करून भात पीक वाचवले. मात्र, आज त्याच शेतकऱ्याच्या शेतपिकांवर अवकाळी पावसाचा चांगलाच मार बसलाय. जिल्ह्यात अवकाळीचा पाऊस जोरदार बरसल्यानं शेतातील उभं भातपीक जमीनदोस्त तर झालंचं मात्र, शेतात मोठ्या प्रमाणात पाणी ही साचलंय. त्यामुळं मागील आठवड्यात ज्या पिकांना मोटरपंपाने  पाणी देत भातपीक वाचविण्यासाठी सिंचनाची व्यवस्था केली, त्याचं मोटरपंपाने अवकाळी पावसामुळं साचलेलं पाणी काढून भातपीक वाचविण्याची नामुष्की ओढवली आहे. 


व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल


शेतात साचलेलं अवकाळीचं पाणी मोटरपंपाने बाहेर काढायचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे. अवकाळीमुळं शेतकऱ्याची झालेली ही अवस्था एकट्या प्रल्हाद पाटील यांची नसून जिल्ह्यातील भात पीक उत्पादक शेकडो शेतकऱ्यांची आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.   


फळबागांसह भात आणि पालेभाज्या पिकांनाही फटका


भंडारा जिल्ह्यातील मागील तीन दिवसात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसाचा फटका भातपिकांसह पालेभाजी पिकांनाही बसला आहे. यासोबतचं जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या मिरची या बागायती शेतीलाही याचा फटका बसला आहे. अवकाळी पावसानं भात पिकांसह मिरची आणि पालेभाज्याची पिकं जमिनदोस्त झाली आहेत. तर, अनेक शेतातील मिरची पीक जळून खाली पडल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या