मुंबई : मुंबईकरांना, पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे पाणीसाठ्यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. जुलै महिना अखेरपर्यंत मुंबईला पाणीसाठी, पुरेल अशा रीतीने नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईकरांना काळजी करण्याचे कारण नाही, पण, पाण्याचा वापर सर्वांनी काटकसरीने करणे आवश्यक असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.
मुंबईत गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मागच्या वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. असं असलं तरी मुंबईसाठी राज्य शासनाने यापूर्वीच भातसा आणि अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठ्यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे 31 जुलैपर्यंत मुंबईला पाणीसाठा पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन पालिकेनं केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करु नये.
मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा
दरम्यान, सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचं आहे, असं आवाहन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केलं आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील सध्या उपलब्ध पाणीसाठा आणि नियोजन यासंदर्भात आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.
मुंबईसाठी अतिरिक्त पाणीसाठा
मुंबईला सात जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. या सात जलाशयांमध्ये मिळून सध्या 2 लाख 38 हजार 552 दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर गरजेच्या तुलनेत हा साठा 16.48 टक्के आहे. त्याचप्रमाणे, भातसा धरणातून 1,37,000 दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातून 91,130 दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. हा सर्व साठा मिळून दरवर्षीप्रमाणे 31 जुलैपर्यंत मुंबईला पाणीसाठी पुरेल, असं नियोजन प्रशासनाने केलं आहे.
मान्सून आगमनाचा अंदाज
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे, यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती आहे. देशात यंदा 106 टक्के मान्सूनचा अंदाज याआधीच वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याकडून वेळोवेळी वर्तवले जाणारे पावसाचे अंदाज लक्षात घेत, त्याचप्रमाणे पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेवून महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. त्यामध्ये होणारे बदल लक्षात घेवून आगामी काळातील धोरण निश्चिती केली जाईल.
पाण्याचा काटकसरीने वापर होणे आवश्यक
पाणीसाठ्याची उपलब्धता पाहता, सध्या मुंबईत कोणतीही पाणीकपात लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करण्याचं कारण नाही. असं असलं तरी, प्रशासनाने केलेल्या नियोजनाला मुंबईकरांचे देखील सहकार्य केलं पाहिजे. पाण्याचा सर्वांनी काटकसरीने वापर करा, पाणी बचतीच्या उपायांचा अवलंब करा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
कशाप्रकारे पाण्याचा अपव्यय टाळता येईल?
- दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करा, पाण्याचा अपव्यय टाळा.
- आवश्यक तितकेच पाणी ग्लासमध्ये घेऊन प्या. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होते.
- नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा.
- घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेऊन कामे करा.
- वाहने धुण्यासाठी पाईप न लावता भांड्यामध्ये पाणी घेऊन ओल्या कापडाने वाहने पुसा.
- घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या.
- आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका.
- वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होऊ शकतो.
- छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओव्हरफ्लो होणार नाहीत, याची काळजी घ्या.