मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे पाच वाजता शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. ज्या ठिकाणी मेटे यांचा अपघात झाला त्याच ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा अपघात झाला होता.  सुदैवाने गाडीच्या एयरबॅग उघडल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही .मात्र हा मार्ग धोकादायक झाला आहे.


मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनीनजिक 17 मे 2022 रोजी संग्राम जगताप यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात होता. आमदार संग्राम जगताप हे आपल्या मर्सिडिज कारमधून मुंबईच्या दिशेने येत होते. त्यावेळी हा अपघात झाला. एसटी बससोबत झालेली ही धडक अतिशय भीषण होती. पण कारमधील एअरबॅग उघडल्या आणि  सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.  


या अपघातानंतर अर्धा तासाने पोलीस प्रशासन मदतीला आले होते असं संग्राम जगताप यांनी सांगितला होतं. तसेच ज्या ठिकाणी अपघात झाला तो परिसर धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटले आहे. आमचा अपघात झाला तेव्हा सर्व गाड्या ड्रायव्हर्जन करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अचानक गाडीने ट्रॅक चेंज केल्याने आमचा अपघात झाला असल्याचं जगताप यांनी म्हटलं. मोठ्या गाड्यांना ट्रॅक ठरवून दिला तर अपघात होणार नाही असं मत संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं आहे. 


पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघाताची कारणे
सातत्यानं पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात होत आहेत. आज या महामार्गावर झालेल्या अपघात शिवसंग्रमाचे प्रमुख विनायक मेटे यांचा मृत्यू झाला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात होण्याची विविध कारणं आहेत. या महामार्गावर अनियंत्रित उतार आहे. टोकदार वळणे देखील आहे. तसेच यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपघातांची संख्या व नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणे-मुंबईचा प्रवास हा अनेकांना नकोसा झाला आहे. जड वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक, रस्त्याच्या कडेला होणारे वाहनांचे अवैध पार्किंग तसेच वाटेत बंद पडणारी वाहने, घाटात वाहने चालविणारे अकुशल चालक, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे अशी अपघाताची विविध कारणे आहेत.


मेटेंच्या अपघाताला कारणीभूत ट्रकची ओळख पटली
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंच्या गाडीच्या अपघातासाठी जो ट्रक कारणीभूत ठरला आहे त्याची माहिती लागली असून तो ट्रक पालघरमधील असल्याचं समजतंय. या ट्रक मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या हा ट्रक गुजरातमध्ये असल्याने पोलिसांची एक तुकडी गुजरातला रवाना झाली आहे. 


पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या कारचा भीषण अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  ज्या ट्रक बरोबर हा अपघात घडला तो ट्रक पालघर जिल्ह्यातील कासा येथील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या ट्रकचा नंबर DN 09 P 9404 असा असून हा ट्रक आयसर कंपनीचा असल्याची माहिती आहे. या ट्रक चालकाचे नाव उमेश यादव असं असल्याचं सांगितलं जातं. हा ट्रक ताब्यात घेण्यासाठी पालघर पोलीस गुजरातमधील वापी येथे रवाना झाले असून ट्रकची ओळख पटविण्यासाठी ट्रक मालकाला सोबत घेतले असल्याची माहिती दिली आहे.