Governor Bhagat Singh Koshyari : मागील काही महिन्यांपासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari Statement) यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. मला निवृत्त व्हायचे आहे. मात्र, मी राज्यपालपदावर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यपालपदावर सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
अहमदनगरमधील 'स्नेहालय' संस्थेच्यावतीने युवा प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, समाज सुधारवण्याचे काम युवकांना करावं लागणार आहे. मला निवृत्ती मिळायला हवी पण तरीही मी या राज्यपालपदावर काम करतोय. खरं तर पंतप्रधान मोदींनी माझ्यापेक्षा स्नेहालय संस्थेच्या गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या व्यक्तीला राज्यपाल करायला. त्यांनी समाजासाठी खूप मोठ काम केलं असल्याचेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.
शेजारच्या देशात प्रगती व्हावी
राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी शेजारील देशातही प्रगती व्हावी, असे प्रतिपादन केले. राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले की, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाने प्रगती केली आहे. विशेष करून मागील सात-आठ वर्षात देशाने भरपूर प्रगती केली आहे. ज्या घरात वीज नव्हती तिथं वीज आली. ज्या घरात शौचालय नाही तिथं शौचालय बनवण्यात आले. देशातील 33 कोटी लोकांचे बँकेत खातं सुरू करण्यात आले. अशी अनेक काम होतं असल्याने समाधान वाटतंय असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. मात्र, आपल्या शेजारील देश देखील समृद्ध असावेत असेही त्यांनी म्हटले. शेजारचे देश कमकुवत असतील तर त्याचा आपल्या देशावरही परिणाम होतो. त्यामुळे सर्वांचीच प्रगती होणं गरजेचं असल्याचे त्यांनी म्हटले.
मुंबईबाबतच्या वक्तव्याने राज्यपालांविरोधात टीकेची झोड
मुंबईबद्दल केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली होती. राजस्थानी आणि मारवाडी लोकांना मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकलं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणाच नाही असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. सर्वच पक्षांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला होता. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी दिलगिरी व्यक्त करताना म्हटले की, एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.