Ramgiri Maharaj : आरसीपी, बीएसएफचे जवान, पोलिसांचा मोठा फौजफाटा; रामगिरी महाराजांच्या सरला बेटावर सुरक्षा वाढवली; नेमकं कारण काय?
Ramgiri Maharaj : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
अहिल्यानगर : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिक (Nashik) येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले करण्यात आली होती. महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात आली होती. यानंतर आता सोशल माध्यमावर एका विशिष्ट समाजाकडून पोस्ट व्हायरल करत संभाजीनगरमध्ये एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे रामगिरी महाराजांच्या सरला बेटावर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साधारण दीड महिन्यापूर्वी रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता विशिष्ठ समाजाकडून सोशल माध्यमावर पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. ही पोस्ट व्हायरल होताच प्रशासन सतर्क झाले असून सरला बेटावर पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. यामुळे सरला बेटला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
काय म्हटलंय पोस्टमध्ये?
हम बताने आ रहे है सही क्या और गलत क्या. हुजुर की शान मे गुस्ताखी बर्दाश नही करेंगे... चलो सरला बेट..., अशा आशयाची पोस्ट संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या सोशल माध्यमांवर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. सरला बेटावर दंगा नियंत्रण पथक, BSF चे बंदूकधारी जवान, संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर रामगिरी महाराजांचा भक्त परिवारही मोठ्या संख्येने सरला बेटावर उपस्थित आहे. रामगिरी महाराज मात्र आपल्या दैनंदिन किर्तन कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, महंत रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी थेट अल्पसंख्यांक समाजावर टीका केली आहे. तसेच, रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत हिंदू जागरण मेळाव्याच्या माध्यमांतून नितेश राणे वादग्रस्त विधाने केली होती. यानंतर सोलापूरातील कम्युनिष्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी अल्पसंख्यांक मेळाव्यातून आमदार नितेश राणे आणि रामगिरी महाराजांवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच, यंदा निवडणुकीत निवडून आल्यावर रामगिरी महाराजांना बेड्या घातल्या नाही तर मला आडम मास्तर म्हणू नका, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
आणखी वाचा