IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणाचे अहमदनगर कनेक्शन समोर; दिव्यांग प्रमाणपत्र देणारे रुग्णालय नगरचं, अभिलेख तपासणीत बाब समोर
राज्यासह देशभरात गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत आलेली ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्रबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्याबाबत आता महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
अहमदनगर: राज्यासह देशभरात गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत आलेली ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर(IAS Pooja Khedkar) हिच्या दिव्यांग प्रमाणपत्रबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्याबाबत आता महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर(IAS Pooja Khedkar) हिला अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पूजा खेडकरला डोळे आणि मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र 2021 मध्ये दिल्याची माहिती आहे. तसेच तत्कालीन वैद्यकीय मंडळांना हे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती देण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्या असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले आहेत.
पूजा खेडकरचे(IAS Pooja Khedkar) वडील सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर हे भालगाव (ता. पाथर्डी) येथील रहिवासी आहेत. परंतु, गेल्या काही वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी पूजा खेडकर ही दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाली आहे. प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून तिची पुण्यात नियुक्ती झाली होती. खासगी वाहनावर लाल दिवा लावणे, भारत सरकार असा बोर्ड लावणे, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात हस्तांतरीत करणे, आदी नियमबाह्य वर्तन तिने केले होते त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली होती.
दिव्यांग प्रमाणपत्रासह नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्राचा देखील वाद?
पूजा खेडकरने(IAS Pooja Khedkar) UPSC नागरी सेवा परीक्षेत पात्र होण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रासोबतच नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र देखील जोडलो होते. पण पूजाच्या ओबीसी नॉन क्रीमिलीयर कँडिडेट असण्यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उमेदवाराच्या वडिलांची संपत्ती 40 कोटी रुपये असेल तर त्यांच्या पाल्याचा ओबीसी नॉन क्रीमी लेयरमध्ये कसं गृहीत धरलं जाईल? असा सवाल उपस्थित होत आहे.
त्याचबरोबर लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत खोट्या प्रमाणपत्राद्वारे तिने हे पद मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करत पूजा खेडकर आयएएस झाली. त्यासाठी तिला सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले होते. परंतु सहा वेळा ती हजर राहिली नाही. त्याऐवजी बाहेरुन वैद्यकीय अहवाल दिला, त्यामुळे वाद निर्माण झाला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गाडी, बंगला, केबिन, कामासाठी कर्मचारीअशा मागण्या केल्यानंतर प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची राज्य सरकारने बदली केली. त्यानंतर तिच्यासह तिच्या कुटुंबीयांची प्रकरणे समोर येऊ लागली. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे तिने नोकरी मिळाल्याचा दावा केला जात आहे. पूजा खेडकरने(IAS Pooja Khedkar) केंद्रीय नागरी सेवा आयोगाला सादर केलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांव्यतिरिक्त ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्रात विसंगती आढळून आल्या. तिच्या वडिलांनी अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्याआधारे त्यांच्या उत्पन्नाचे तपशील समोर आले. त्यामध्ये त्यांच्याकडे ४० कोटींचे उत्पन्न असल्याचे सांगण्यात आले आहे. ओबीसी नॉन क्रिमिलेयरसाठी ८ लाखांच्या उत्पन्नाची अट आहे. त्यामुळे तिच्या वडिलांची संपत्ती पाहता नॉन क्रिमिलेयरमधील पात्रतेवर प्रश्न निर्माण होत आहे.