OBC Mahaelgar Melava अहमदनगर : येथील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर उद्या (दि. 03) ओबीसीचा (OBC) महाएल्गार मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला दीड ते दोन लाख ओबीसी बांधव येतील, असा दावा आयोजकांकडून करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने अहमदनगरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे.


या मेळाव्याच्या नियोजनासाठी सात वेगवेगळ्या समित्या गठित करण्यात आल्या असून जवळपास 500 स्वयंसेवक तैनात असणार आहेत. ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सात समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. ज्यात पाणीवाटप समिती, पार्किंग समिती, वाहतूक नियमन समिती, आरोग्य समिती ,नाश्ता वाटप समिती, मुख्य स्टेज नियोजन समिती यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मेळावा परिसरामध्ये तीन कार्डीयाक रुग्णवाहिकांसह पाच रुग्णवाहिका असतील, ठिकठिकाणी मेडिकल किटचे वितरण करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सात ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.


'या' नेत्यांची असणार उपस्थिती


मराठा समाजाला ओबीसीमधून नव्हे तर स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी ओबीसी समाजाच्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या महामेळाव्याच्या आयोजन करण्यात आला आहे. या महाएल्गार मेळाव्यात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे,आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर , आमदार प्रकाश शेंडगे, कल्याण दळे, लक्ष्मण गायकवाड , शब्बीर अन्सारी,  पी.टी चव्हाण , दौलत शितोळे, सत्संग मुंडे, लक्ष्मण हाके या ओबीसी नेत्यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. 


25 हजार हरकती नोंदवल्या जाणार


विशेष म्हणजे या मेळाव्या दरम्यान मराठा आरक्षणावर हरकती घेणाऱ्या जवळपास 25 हजार अर्जंट वाटप करून ते अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था या महाएल्गार मेळाव्याच्या ठिकाणी असणार आहे, अशी माहिती समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अंबादास गारुडकर यांनी दिली आहे. 


पोलिसांकडून विशेष खबरदारी


या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात बॅनर लावण्यात आले आहे. हे बॅनर काही समाजकंटकांनी फाडल्याच्या घटना देखील समोर आले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जाऊ शकते. मराठा आरक्षणामुळे ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या मेळाव्याच्या ठिकाणी तसेच शहरात मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे.


छगन भुजबळ काय बोलणार?


या मेळाव्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार राम शिंदे यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण अध्यादेश निघाल्यानंतर प्रा.आ.राम शिंदे यांनी मराठा युवकांनी साजरा केलेला जल्लोषात सहभाग घेतला होता. आता हेच आमदार राम शिंदे ओबीसी महा एल्गार मेळाव्याच्या मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांच्यामध्ये कायमच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला. त्यामुळे या महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


आणखी वाचा 


मोठी बातमी! राज ठाकरेही घेणार काळाराम मंदिराचे दर्शन; म्हणाले "अयोध्येचीही मूर्ती काळी, आपले..."