Ahmednagar News : सध्या अहमदनगरमधील (Amednagar) अधिकमासात जावयाचं केलं जाणारं धोंडे जेवण हा चर्चेचा विषय ठरत आहे. नगर शहरापासून अगदी वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र आगडगाव काळभैरवनाथ देवस्थानच्या वतीने सहाशे जावयांचं धोंडे जेवण घालण्यात आलं आहे. अधिकमासामध्ये जावायाचा करायचा पाहुणचार हा यथोपचार प्रत्येक कुटुंबात केला जातो. पूर्वीच्या काळात लेक लग्न करुन सासरी गेलेली लेक आणि तिच्या पतीचा पाहुणचार या अधिकमासात केला जात असे. तीच परंपरा आजतागायत सुरु आहे. जावायला करायाच्या धोंडे जेवणात पुरणपोळीचा साग्रसंगीत स्वयंपाक केला जातो. त्याचप्रमाणे जावयाला पोशाख देऊन सोने किंवा चांदीचा दागिना देतात. पण अनेक कुटुंबात हा कायक्रम करताना रुसवे फुगवे होत असल्याचं पाहायला मिळतं.
एकाच ठिकाणी अन एकाच वेळी झाला जावयांचा पाहुणचार
प्रत्येक कुटुंबात हौसेनं केलं जाणारं हे धोंडे जेवण नगरच्या आगडगावमध्ये मात्र एकाच ठिकाणी करण्यात आलं आहे. या गावामध्ये दर रविवारी आमटी भाकरीचा प्रसाद केला जातो. या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी गावातील आणि आजूबाजूच्या खेडेगावातील अनेक भाविक आवर्जुन येत असतात. दरम्यान देवस्थानच्या एका बैठकीमध्ये जावयांचं एकत्रित धोंडे जेवण घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सुरुवातील यामध्ये फक्त आगडगावमधील जावयांचं एकत्रित धोंडे जेवण घालण्याचं ठरवण्यात आलं होतं. मात्र या विषयाची चर्चा आजूबाजूच्या खेडेगावामध्ये झाल्याने अनेकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
आपल्या जावयाला देवस्थानच्याच धोंडे जेवणात सहभागी करुन घेण्याची विनंती अनेकांनी देवस्थानच्या समितीला केली. त्यानंतर बघता बघता 600 जावयांची नोंद करण्यात आली. त्यानंतर या 600 जावयांच देवस्थान समितीच्या वतीने धोंडे जेवणाचा सोहळ करण्यात आला. साडेसात हजार किलोचे पुरण तसेच भात, आमटी आणि धोंडे तयार करण्यात आले होते. स्वयंपाक तयार करण्यासाठी आगडगाव, देवगाव, जेऊर या आसपासच्या गावातील महिलांनी मदत केली आहे.
या धोंडे जेवणात सर्व जावयांना आणि लेकीनां देवस्थान ट्रस्टच्या वतीने कपडे ,साडी आणि दहा ग्रॅम चांदीचे नाणे देण्यात आले. सुरुवातीला सर्व जावयांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर सर्व जोडप्यांनी मंदिराला सामूहिक प्रदक्षिणा घातली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी 18 ते 20 हजार भाविकांनी या धोंडे जेवणाच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. जावयांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. तर दरवर्षी अशाच प्रकारचे धोंडे जेवण करावे असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.