कर्जत-जामखेड एमआयडीसीवरुन राजकारण तापलं,रोहित पवारांची भाजप आमदार राम शिंदेंवर टीका
माझे विरोधक हे कुठल्यातरी एखाद्या जमिनीवर जातात, अधिकाऱ्यांना बोलावतात आणि फोटो काढतात. मात्र त्यांना हेच माहीत नाही की सर्व्हे कसा केला जातो? असा सवाल रोहित पवारांन केला आहे.
अहमदनगर: कर्जत-जामखेड (Karjat- Jamkhed) विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसी पाटेगाव-खंडाळा येथे व्हावी यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आग्रही होते मात्र सरकारने एमआयडीसीची (MIDC) जागा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) हे नागरिकांना जागा सुचवण्यासाठी बैठका घेत आहेत. यावरून रोहित पवार यांनी भाजप (BJP) आमदार राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवारांच्या टीकेवर राम शिंदेंनींही प्रत्युत्तर दिलंय
रोहित पवार म्हणाले, माझे विरोधक हे कुठल्यातरी एखाद्या जमिनीवर जातात, अधिकाऱ्यांना बोलावतात आणि फोटो काढतात. मात्र त्यांना हेच माहीत नाही की सर्व्हे कसा केला जातो? आमदार राम शिंदे यांच्या सोबत जे अधिकारी इकडे- तिकडे फिरत आहेत. त्यांना एमआयडीसीकडून अधिकृत कोणतही पत्र मिळालं नाही. केवळ फोटो काढून लोकांना असं भासवायचं की, मी खूप काम करत आहे. मात्र लोकं एवढी भोळी नाहीत, लोकांना सर्व कळतं. एवढे मोठे सर्व्हे आम्ही करून घेतले. त्यावेळी मी स्वतः कुठेही गेलेला नव्हतो. अधिकाऱ्यांनी सर्व ड्रोन सर्व्हे केले. एमआयडीसीसाठी योग्य ते ठिकाण अधिकाऱ्यांनीच निवडला आहे. आमचे विरोधक नाटक किती दिवस करतात हे बघावे लागेल असा टोला त्यांनी लगावला.
रोहित पवारांनी निवडलेली जागा कुणाची होती? : राम शिंदे
एमआयडीसी बाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना पत्र मिळाले असून ते सोशल मीडियावर पत्र देखील व्हायरल झाले आहे. सर्व्हेबाबत मी नागरिकांना जागा सुचवायला सांगितले आहे. मी कुठेही फोटो काढायला गेलेलो नाही. मी तरी नागरिकांच्या मीटिंग घेतोय. पण माझा रोहित पवारांना ओपन सवाल आहे की, त्यांनी जागा निवडताना एखादी तरी बैठक घेतली होती का? त्यांनी निवडलेली जागा नेमकी कोणाची होती? निरव मोदीच्या जागेसाठी काही बोलणं झालं होतं का ? पाटेगाव ग्रामपंचायत न विरोध का केला? फॉरेस्टमधील जागा का सुचवली? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत असं राम शिंदे यांनी म्हंटलं आहे.
निवडणूक पूर्व सर्व्हेबाबत राम शिंदेंची प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकीसंदर्भामध्ये अनेक निवडणूक पूर्व सर्व्हेसमोर आलेले आहेत. त्यामध्ये देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेचा कौल दिसत आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये भाजपला जनतेचा कौल दिसत नाही. याबाबत बोलताना भाजप आमदार राम शिंदे यांनी सर्व्हेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मागील काही सर्वेंचा विचार केला तर गुजरातमध्ये भाजपला कल दिला नव्हता, उत्तर प्रदेश मध्ये देखील तशीच परिस्थिती होती. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत देखील भाजपला एकही राज्य मिळणार नाही असा सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं होतं. मात्र पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये तीन राज्य भाजपने मिळवली. गुजरात मध्ये देखील विजय मिळवला. त्यामुळे या सर्व्हेवर कितपत विश्वास ठेवावा असा राम शिंदे यांनी म्हटल आहे.