शिर्डी, अहमदनगर: विरोधकांच्या इंडिया आघाडीचं (INDIA Alliance) दोन दिवसीय बैठक सत्र मुंबईत सुरू आहे. भाजप विरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत, येत्या 2024 मधील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) देशपातळीवर भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व एकत्र आले आहेत. याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इंडिया आघाडीवर भाष्य करत विरोधकांना टोला लगावला आहे. आगीशी खेळू नका, अख्खा महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज (31 ऑगस्ट) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी दौऱ्याची सुरुवात शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने केली, यानंतर लोणी येथे आयोजित साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास हजेरी लावत विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या कलावंतांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह संरक्षणमंत्र्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर निशाणा साधला.


आगीशी खेळू नका, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा


लोणीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना निशाण्यांवर घेत टोले लगावले आहेत. एकत्र आलेल्या विरोधी पक्षांनी एवढंच सांगू इच्छितो की, आगीशी खेळू नका, असं ते म्हणाले. आमच्या आघाजीत अनेक चेहरे आहेत असे विरोधक म्हणतात, परंतु अनेक चेहरे कोणाला असतात हे सर्वांना माहीत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना रावणाची उपमा दिली आहे. तर आम्ही रामभक्त आहोत हे लक्षात ठेवा, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला.


'मोदींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील याची खात्री'


एका माणसाच्या विरोधात एवढे लोक एकत्र आले आहेत, त्या फोटोत चेहरे सुद्धा नीट दिसत नाही, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महाभारतात कोणाचा पराभव झाला हे लक्षात असू द्या, असं म्हणत कोणीच मोदींना हरवू शकत नाही, असं मुख्यमंत्री शिंदेंनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. मोदींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील, याची खात्री देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.


इंडिया नाव घेऊन नौका पार होत नाही - राजनाथ सिंह


देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील विरोधी आघाडी इंडियाच्या बैठकीवर निशाणा साधला आहे. आज विरोधी पक्षांची बैठक असली तरी त्याचा उपयोग होणार नाही, असं ते म्हणाले. नाव मोठं आणि लक्षण खोटं, असं म्हणत राजनाथ सिंहांनी इंडिया आघाडीला टोला लगावला. इंडिया (INDIA) नाव घेऊन नौका पार होत नाही, कर्म पाहिजे, असा सल्ला राजनाथ सिंहांनी दिला. तर जनतेचं समर्थन आज मोदींच्या पाठीशी असल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले.


हेही वाचा:


I.N.D.I.A : इंडिया आघाडीच्या समन्वयकपदाची जबाबदारी इतकी का महत्त्वाची? या आधी एका समन्वयकाची थेट पंतप्रधानपदी वर्णी