मुंबई: विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आजपासून मुंबईत सुरू होणार असून त्यासाठी देशभरातून नेते जमा झाले आहेत. मुंबईत होणाऱ्या या तिसऱ्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या समन्वयकपदी कोण असेल याची घोषणा केली जाणार आहे. इंडिया आघाडीच्या समन्वयपदासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची नावं चर्चेत आहेत. या विरोधी पक्षांच्या समन्वयपदावरील व्यक्ती पुढच्या निवडणुकीनंतर थेट पंतप्रधान झाल्याचं उदाहरण आहे. त्यामुळे समन्वयपदावर आपलीच वर्णी लागावी यासाठी नितीश कुमार प्रयत्न करत आहेत. 


व्ही पी सिंग समन्वयकपदावरून थेट पंतप्रधान बनले 


1989 मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे मजबूत सरकार केंद्रात सत्तेत होते. परंतु व्हीपी सिंह यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला. व्हीपी सिंह यांनी त्यावेळच्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून राष्ट्रीय आघाडी स्थापन केली. या विरोधी आघाडीचे समन्वयक व्हीपी सिंह बनले. 


त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. विजयानंतर पंतप्रधान निवडीसाठी या राष्ट्रीय आघाडीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत देवीलाल यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले, पण देवीलाल यांनी व्हीपी सिंग यांचे नाव पुढे केले. देवी लाल यांचा युक्तिवाद असा होता की व्हीपी सिंह यांनी निवडणुकीत संयोजक म्हणून खूप मेहनत घेतली होती, त्यामुळे पंतप्रधानपदासाठी त्यांचा सर्वाधिक दावा आहे.


हरकिशन सुरजीत 1996 मध्ये संयुक्त आघाडी सरकारमध्ये समन्वयक होते. सुरजित यांच्या अंतिम मंजुरीनंतरच एचडी देवेगौडा आणि आयके गुजराल पंतप्रधान झाले. 


जॉर्ज फर्नांडिस यांना केंद्रात महत्त्वाची खाती 


अटल बिहारी वाजपेयी यांनी काँग्रेस विरोधी पक्षांना एकत्रित करत एनडीएची बांधणी केली. त्यामध्ये सर्व पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी त्यांनी जॉर्ज फर्नांडिस (George Fernandes) यांची समन्वयक पदी नियुक्ती केली. 1998 मध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाले तेव्हा आघाडीचे निमंत्रक जॉर्ज फर्नांडिस यांना केंद्रात मंत्री करण्यात आले. जागा वाटपात जॉर्ज यांचा मोलाचा वाटा होता. अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये 10 जागा असलेल्या समता पक्षाला संरक्षण, कृषी, रेल्वे अशी महत्त्वाची खाती मिळाली होती.


केंद्रात काँग्रेसच्या डॉ. मनमोहन सिंह सरकारच्या काळात यूपीए आघाडीचे निमंत्रक अहमद पटेल होते. या काळात सोनिया गांधींनी पंतप्रधान कार्यालय अहमद पटेल यांच्यामार्फत चालवल्याचा खुलासा डॉ. मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार असलेले संजय बारू यांनी आपल्या पुस्तकात केला होता. अहमद पटेल हेच मंत्र्यांची नावे फायनल करायचे असंही त्यांनी म्हटलं आहे. 


ही बातमी वाचा: