Ahmednagar Rain : अहमदनगर (Ahmednagar) शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Rain) झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या पावसामुळं सीना नदी देखील दुथडी भरुन वाहत आहे. दरम्यान, सीना नदीचे पाणी रस्त्यावर आल्यानं नगर-कल्याण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सीना नदीच्या (Sina River)पुलावरुन सध्या पाणी वाहत आहे. तर सीना नदी काठावरील काही नागरिकांच्या घरात देखील पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे.


नगर जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांत 60 मिली मीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.  यात राहुरी तालुक्यातील वांबोरी महसूल मंडळात दोन ते तीन तासात 103 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. शहरातील नरहरी नगर येथील काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तर रात्री नगर-औरंगाबाद तसेच नगर-मनमाड महामार्गावर पाणी साचलं होतं. सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं आहे. तसेच नालेसफाई न झाल्यानेच घरात पाणी शिरल्याच्या आरोप नागरिकांकडून होत आहे. या पावसामुळं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. नगरच्या दक्षिण भागात अद्याप जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.  


राज्याच्या जोरदार पाऊस, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर, नवी मुंबई यासह लातूर, सोलापूर या जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, सातारा या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपता पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून, महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  


लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान


लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी झाली असून शेताचे रुपांतर शेततळ्यात झाले आहे. त्यामुळं पिकं वाहून गेली आहेत. पुलावर पाणी आल्यामुळे विद्यार्थी आणि शेतकरी अडकून पडले आहेत. कमी कालावधीमध्ये झालेल्या तुफान पावसाने शेतातील पिकं वाहून गेली आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भेटा आणि अंदोरा गावाच्या शिवारात तुफान पाऊस झाल्यामुळे भेटा - अंदोरा पुलावरून पाणी वाहत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना घरी जाण्यासाठी पाणी उतरण्याची वाट पहावी लागणर आहे.


महत्त्वाच्या बातम्या: