अहमदनगर : महिलांच्या सुरक्षेसाठी (Women Safety) अनेक कायदे करण्यात आले, कायद्यांची अंमलबजावणी सुद्धा कडकपणे करण्यात येते. तरीसुद्धा महिलांवरील हल्ले, अत्याचार (Women Molestaion) थांबायचं नाव घेत नाही. मुलींना कणखर बनवणे आज गरजेचे असून त्यांना स्वरक्षणाचे धडे सुद्धा दिले गेले पाहिजेत. अवघ्या नऊ वर्षाची चौथी शिकणारी संगमनेर तालुक्याच्या (Sangamner) ग्रामीण भागातील शौर्या सरोदे साहसी खेळात पारंगत झाल्यावर गेल्या काही महिन्यांपासून आपल्याच गावातील मुला-मुलींना लाठी-काठीचे प्रशिक्षण देते आहे. 


संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला हे गाव. याच गावातील इयत्ता चौथी शिकणारी नव वर्षांची शौर्या (Shaurya Sarode) गेल्या अनेक वर्षांपासून आपले वडील नवनाथ यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी गडावर जाते. शिवनेरी गडावरील वातावरण (Shivneri Fort) तिला नेहमीच विशेष वाटायचं, त्याशिवाय तेथे तरुण आणि मुले साहसी खेळांचा सराव करताना ती पाहत होती. आणि यातूनच प्रेरित होऊन तिने देखील आपल्याला हे सगळं शिकायचे, असा निर्धार केला आणि वडिलांच्या मोबाईलवर साहसी खेळांची माहिती घेतली. मोबाईलवर पाहून तिने लाठीकाठीचा सराव सुरू केला आणि या सरावात तिच्या वडिलांनी तिला पूर्ण साथ दिली. 


दरम्यान नित्यनियमाने अनेक वर्ष सराव केल्यानंतर ती पारंगत झाली व लाठी फिरवू लागली. आपल्याला येत असलेला साहसी खेळ तिने सर्वांना शिकायचं ठरवलं आणि दररोज गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वडिलांच्या मदतीने ती गावातीलच मुला आणि मुलींना लाठीकाठीचं प्रशिक्षण देते आहे. शौर्या चार वर्षांची असताना आम्ही शिवनेरी गडावर गेलो. तिने आग्रह केल्यामुळे मीही शिकलो. तिला आज चांगलं पोहता सुद्धा येत असून बालवयात मोबाईल गेम पासून दूर राहिल्याने ती मैदानी खेळात पूढे जाते, याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया वडिलांनी दिली. तर शौर्यामुळे आम्हाला मोठं झाल्यावर स्वरक्षणासाठी याचा फायदा होईल, अस मत शर्वरी शिंदे या मुलीने व्यक्त केले आहे. 


शौर्या परिसरातील आदर्श


शौर्या वडिलांच्या मदतीने निपुण झाली आणि त्याचा फायदा आज गावातील मुलांना होतो, याचा आनंद वाटतो. ज्या ज्या वेळी आपण संकटात आलो, स्त्री शक्तीने त्यावेळी त्याचा सामना केला. शौर्या देखील आज असाच आदर्श निर्माण करत स्त्री शक्तीला मजबूत करत असल्याची अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांची आहे. शौर्या लाठीकाठीसह उत्तम जलतरणपटू असून स्केटिंग, बॉक्सिंगचा सुद्धा सराव करते आहे. मोबाईल गेमपेक्षा बालवयात मैदानी व साहसी खेळांची आवड निर्माण झाली तर समाज अधिक कणखर होऊ शकतो, हेच शौर्याने सिद्ध केलय हे नक्की.. 



संबंधित बातमी : .


Sangamner News : दहावीत फेल, पण मागं फिरून पाहिलं नाही, पोळपाट-लाटणं विकत संगमनेरचा तरुण झाला पोलीस..