अहमनदगर : परिस्थिती कशीही असली तरी तुमच्याकडे जिद्द असेल तर एक दिवस ध्येय निश्चित गाठता येतं. याचचं उत्तम उदाहरण अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील केवल कतारी या तरुणाने घालून दिला आहे. झोपडपट्टीत राहणारा व कुटुंबासमवेत पोळपाट, लाटणे आणि चौरंग बनवून बाजारात विकणारा केवल महाराष्ट्र पोलीस दलात ( Maharashtra Police) भरती झाला आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून कष्ट घेत पोलीस दलात भरती झाल्याने आईवडिलांना आनंदाला पारावर उरला नाही.
संगमनेर (Sangamner) शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या झोपडपट्टीत राहाणारा 30 वर्षीय केवल कतारी (Kewal Katari). वडील दारासिंग आणि आई मुन्नीबाई कतारी हे लाकडी पोळपाट, लाटणे आणि चौरंग बनवून यात्रा-जत्रा आणि गावोगावच्या बाजारात विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. 2008 साली केवल दहावीत नापास झाला आणि त्याने शिक्षण अर्धवट सोडले. त्यानंतर त्याने आई वडिलांना कामात मदत करायचे ठरवले आणि स्वतः देखील पोळपाट, लाटणे बनवून बाजारात विकू लागला.. मात्र मोठ्या भावाने आणि वडिलांनी त्याला प्रोत्सान दिले आणि सहा वर्ष गॅप घेतल्यानंतर 2014 ला केवलने पुन्हा दहावीची परीक्षा दिली. त्यात 48 टक्के मिळवून तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर दिवसा पोळपाट लाटणे बनवणे, लग्नात वाढपी म्हणून काम करणे आणि रात्री अभ्यास असा दिनक्रम सुरु ठेवला.
दरम्यान केवलने नंतर कला शाखेतून 12 वीत 78 टक्के गुण मिळवले. तसेच संगमनेर महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मुंबईत ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र पोलिसांनी बाजवलेल्या कामगिरीबद्दल माहिती असल्याने केवल याला पोलीस दलाचे विशेष आकर्षण होते. केवलने निश्चय केला आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यानच्या काळात घरच्यांनी केवलचे लग्न लावून दिले, मात्र त्याने अभ्यास आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले आणि नुकतीच मुंबई पोलीस (Mumbai) दलात त्याची निवड झाली.
आम्ही दोघे अशिक्षित आहे, मात्र मुलाने शिकून मोठं व्हावं असं स्वप्न होतं, आज माझ्या मुलाने मातीचं सोनं करून दाखवलं, अशा भावना केवलच्या वडिलांनी व्यक्त केल्या. आम्हाला आज जो आनंद झालाय तो यापूर्वी कधीच झाला नव्हता अशी प्रतिक्रिया केवलची आणि भावाने व्यक्त केल्या आहेत. जीवनात एखादं लक्ष्य ठेवत त्यावर मेहनत केली तर काहीच अशक्य नाही. आज तरूणपणी मुले मुली सोशल मीडियात हिरो होण्याची स्वप्नं पाहत असतात, मात्र केवल सारख्या तरुणांचा आदर्श समोर ठेवला तर आयुष्य सुंदर होते हे मात्र नक्की.
इतर महत्वाची बातमी :