अहमदनगर : अयोध्येतील भव्य अशा श्रीराम मंदिराचे (Ram Mandir) काम सध्या विविध टप्प्यांमध्ये सुरु आहे. जानेवारी 2024 मध्ये या मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती बसवण्याच्या मुहूर्त सरकारने ठरवला आहे. अयोध्येमधील मंदिर हे भव्यदिव्य असून या मंदिरात गेल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनातील सर्वच प्रसंग आपल्याला शिल्पाच्या (Sculpture) रुपाने पाहायला मिळणार आहेत. या कामाचे वेगवेगळे टप्पे करण्यात आले आहेत. बांधकामाबरोबरच या ठिकाणी रामायणातील प्रसंग शिल्पकृतीत उभारण्याचेही काम सुरु आहे. प्रदक्षिणा मार्गावर हे शिल्प उभारण्यात येत आहेत. दगडापासून तयार करण्यात येणाऱ्या या शिल्पाचे 3D मॉडेल अहमदनगर (Ahmednagar) इथले सुप्रसिद्ध चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे (Pramod Kamble) हे साकारत आहेत. त्यानंतर हे 3D मॉडेल जयपूर आणि राजस्थानला पाठवण्यात येणार आहे.


हे माती शिल्प तयार करण्यासाठी देशभरातील जवळपास एक हजार कलाकारांकडून नमुने मागवण्यात आले होते. त्यानंतर प्रमोद कांबळे यांनी बनवलेल्या मॉडेलची निवड करण्यात आली. या मातीच्या शिल्पाप्रमाणेच हुबेहूब दगडांची शिल्प बनवण्यात येणार आहेत. "हे काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो, माझ्यावर असलेली जी जबाबदारी फार मोठी असून ती नीटपणे पार पाडणे हे महत्त्वाचे आहे," अशी भावना शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केली. 


श्रीरामाच्या जन्मापासून वनवास संपवून परतल्याचा प्रसंग 


रामायणातील तब्बल 100 प्रसंग या शिल्पाच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. हे शिल्प बनवताना ते सात्त्विक भावनेतून बनवावे यासाठी शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी अनेक पथ्य देखील पाळली. सुरुवातीला हे शिल्प वेगवेगळ्या कलाकारांकडून बनवून घेतली जाणार होती मात्र त्या प्रसंगातील प्रत्येक शिल्पात एकसारखेपणा असावा म्हणून एकाच कलाकाराकडून हे काम करण्याचे ठरले. त्यानुसार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओत या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रभू श्रीराम यांच्या जन्माच्या प्रसंगापासून ते वनवास आणि प्रभू श्रीराम यांचा वनवास संपवून परतल्याच्या प्रसंगापर्यंत अनेक प्रसंग यात साकारण्यात आले आहेत. 


जानेवारी 2024 मध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 


अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम वेगाने सुरु आहे. अयोध्यातील मंदिरातील गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात करण्यात येणार आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 21,22 आणि 23 जानेवारी या तीन तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा


Ram Mandir Lock: अलीगडमधील दाम्पत्यानं राम मंदिरासाठी बनवलं 400 किलोचं कुलूप आणि 30 किलोची चावी