अहमदनगर : भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यात नेहमीच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो. त्यातच भाजप (BJP) आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे (NCP) आमदार निलेश लंके यांनी मोहटादेवी गडावर दर्शनासाठी जाताना एका गाडीतून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि भाजप खासदार सुजय विखे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहेत. आमदार निलेश लंके हे भविष्यातील संभाव्य लोकसभा उमेदवार आहेत, ते सुजय विखे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे.
निलेश लंके आणि राम शिंदे यांची जवळीक
सध्या सर्वच पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठीकडून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना अळीमिळी गुपचिळी करण्याचे सांगितलं जात आहे. आगामी निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात असून सध्याचं राजकीय समीकरण पाहता, एका बाजूला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी तर दुसऱ्या बाजूला, ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस आहे, त्यामुळे निवडणुकांच्या वेळी नेमकं हे चित्र असच राहील का? असंच राहील तर काय होईल असे प्रश्न उपस्थित होते आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती असून राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत. अशातच निलेश लंके आणि राम शिंदे यांची जवळीक विखेंना भारी पडणार असल्याचे चित्र दिसते आहे.
लोकसभा सुजय विखेंना जड जाणार का?
दरम्यान, भाजप खासदार सुजय विखे यांच्याच पक्षातील आमदार राम शिंदे यांच्यासोबत निलेश लंके यांनी प्रवास केल्याने कुठेतरी राम शिंदे हे निलेश लंके यांच्या माध्यमातून सुजय विखे यांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा सुरू आहे. भाजप आमदार राम शिंदे यांचा मागील विधानसभा निवडणुकीत जो पराभव झाला. त्याला विखे कुटुंबीयच जबाबदार असल्याचे म्हणत राम शिंदे यांनी दक्षिणेतील भाजप आजी-माजी आमदारांसोबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार देखील केली होती, तेव्हापासूनच भाजप आमदार राम शिंदे आणि विखे कुटुंबामध्ये धुसफुस सुरूच असते. त्यातच राम शिंदे यांनी निलेश लंके यांच्यासोबत एकत्रित प्रवास करत विखेंवर कुरघोडी केल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे.
राम शिंदे यांचा सुजय विखे यांच्यावर पलटवार
दरम्यान, याबाबत बोलताना भाजप खासदार सुजय विखे यांनी खऱ्या अर्थाने महायुती ही अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी झाल्याचे लंके आणि शिंदे यांच्या एकत्रित प्रवासातून समोर आल्याचे म्हटले असले तरी कुठेतरी आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांच्या एकत्रित प्रवासातून त्यांना शल्य झालेच असेल अशी चर्चा देखील आहे. तर राम शिंदे यांनी देखील पुन्हा एकदा सुजय विखे यांच्यावर पलटवार करत राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या आणि वेगवेगळ्या पक्षातील आमदारांनी एकत्र प्रवास केल्याने एवढी चर्चा होण्याची गरज नाही. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येण्यापूर्वीच भाजप खासदार हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या हातात हात घालून फिरत होते, हे देखील जनतेने पाहिले आहे असा टोला त्यांनी लगावला. आता आम्ही कुणासोबत प्रवास करतो, यावरही लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र जनता भविष्यात ठरवेलच असा सूचक इशारा देखील राम शिंदे यांनी सुजय विखेंना दिला.
महत्वाच्या इतर बातम्या :