अहमदनगर : यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यात अपेक्षित पाऊस (Maharashtra Rain) झालेला नाही आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक गावात पाण्याचा ताळेबंद आखण आवश्यक आहे. उपलब्ध पाण्याचा कसा वापर करायचा, याबाबत अहमदनगरच्या (Ahmednagar) आदर्श गाव हिवरे बाजारने यंदाही उपलब्ध पाण्याचा ताळेबंद सादर केला आहे. दरवर्षी हिवरे बाजार गावात नवरात्रीच्या सातव्या माळेला पाण्याचा ताळेबंद सादर केला जातो.


नेहमीच राज्यातील गावासमोर वेगवेगळे आदर्श घालून देणाऱ्या आदर्श गाव हिवरे (Hivare Bajar) गावात मागच्या 19 वर्षांपासून पाण्याचा ताळेबंद आखला जातो, जेणेकरून उन्हाळ्यात पाणी टंचाई भासत नाही. मात्र यंदा अहमदनगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे यंदाच्या हिवरे बाजारच्या ताळेबंदानुसार गतवर्षापेक्षा यंदा हिवरे बाजार शिवारात सुमारे 75 कोटी लिटर पाणी (Water Storage) कमी उपलब्ध झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात हिवरे बाजार शिवारात केवळ 22 दिवस पाऊस पडला आहे. यावर्षी डिसेंबरनंतर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसतेय, त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत चारा उत्पादनाला प्राधान्य देऊन मुरघास करण्यावर भर असणार आहे.


हिवरे बाजार गावात  2004 पासून पाणलोटात पर्जन्यमापक बसविल्यामुळे अचूक पाण्याचा ताळेबंद येतो. यावर्षी 22 दिवसांत 538 मिलिमीटर पाऊस पडून 525.15 कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले. त्यातील 350.11 कोटी लिटर पाणी गावाच्या वापरासाठी उपलब्ध झाले. गावाची वार्षिक गरज 333.32 कोटी लिटर आहे. त्यामुळे 16.80 कोटी लिटर पाणी राखीव ठेवता येणार आहे. गेल्यावर्षी हिवरे बाजार शिवारात 678 मिलिमीटर पाऊस पडून 428.9 कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले होते. त्यानुसार हिवरे बाजार गावाने यंदा पाण्याचा ताळेबंद आखला आहे. त्यामुळे त्यांना दुष्काळाची झळ सोसावी लागणार नाही. त्यानुसार राज्यातील प्रत्येक गावाने अशापद्धतीने पाण्याचा ताळेबंद आखला तर दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्याची गरज भासणार नाही, असं पोपटराव पवारांनी (Popatrao Pawar)  म्हंटले आहे.


तर दुष्काळी परिस्थिती कधीच उदभवणार नाही


यंदा पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हिवरे बाजारमध्ये अपेक्षित पाणी साठा झालेला नाही. जरी अतिरिक्त पाणी शिल्लक राहणार असले तरी बाजारात विकणाऱ्या पिकांवर भर न देता जनावरांच्या चारा पिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय हिवरे बाजारने घेतला आहे. सोबतच राज्यातील सद्यस्थित पाहता प्रशासनाने आतापासूनच टंचाई नियोजन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत पोपटराव पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच हिवरे बाजार सारखं राज्यातील प्रत्येक गावाने पाण्याचे नियोजन केले तर दुष्काळी परिस्थिती कधीच उदभवणार नाही, असंही पोपटराव पवार म्हणाले. 


हिवरे बाजारच्या पाण्याचा ताळेबंद



  • एकूण पाऊस : 538 मिलिमीटर

  • पावसाचे दिवस : 22

  • उपलब्ध झालेले एकूण पाणी : 525.15 कोटी लिटर.

  • बाष्प होणारे पाणी : 183.80 कोटी लिटर.

  • वाहून जाणारे पाणी: 40.01 कोटी लिटर.

  • जमिनीत मुरणारे पाणी : 89.28 कोटी लिटर.

  • मातीत मुरणारे पाणी:157.54 कोटी लिटर.

  • जमिनीवर साठणारे पाणी : 52.51कोटी लिटर.

  • जलसंधारण कामामुळे मुरणारे अधिकचे पाणी : 50.78 कोटी लिटर.

  • उपलब्ध पाणी (जमा) : 350.11 कोटी लिटर.


इतर महत्वाची बातमी : 


मराठवाड्यासाठी मोठी बातमी! वरील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा दोन दिवसांत निर्णय होणार?