छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून 31 ऑक्टोबरपूर्वी पाणी सोडणे बंधनकारक आहे. परंतु, यंदा या निर्णयाला उशीर होत असल्याने अनेक संघटनांनी आंदोलन सुरु केले आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत नाशिक आणि अहमदनगरच्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोदावरी पाटबंधारे महामंडळ आज किंवा उद्या हा निर्णय घेऊ शकते. तसेच, 8 ते 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. जायकवाडी धरणात सध्या 43 टक्के पाणीसाठा आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यासाठी किती पाणी सोडावे यावरून जलसंपदा विभागाच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या वरिष्ठ अभियंत्यांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याने निर्णय घेण्यासाठी उशीर होत आहे. वरील धरणातून पाणी सोडल्यावर हे पाणी जायकवाडी धरणात येईपर्यंत अंदाजे 30 टक्के पाण्याचा नुकसान होते. त्यामुळे, जायकवाडी धरणात साडेनऊ टीएमसी पाणी यावे, आणि यासाठी साडेबारा टीएमसी पाणी वरील विविध धरणातून सोडण्याचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरच्या अभियंत्यांनी दिला आहे. मात्र, जायकवाडीत साडेसात टीएमसी पाणी पोहोचावे, यासाठी 11 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्याचे प्रस्ताव नाशिक विभागातील अभियंत्यांचा असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे बैठकीत 8 ते 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.