Kolhapur News : तीन जिल्ह्यातील कृषी सहायकांचा कोल्हापुरात ठिय्या; कर्मचारी संपावर अन् खरीप नियोजन वाऱ्यावर
Kolhapur News : गेल्या आठवडाभरापासून हे आंदोलन सुरू असून कर्मचारी संपावर आणि खरीप नियोजन वाऱ्यावर अशी स्थिती कृषी विभागाची झाली आहे.

कोल्हापूर : खरीप हंगाम तोंडावर असतानाच महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. कोल्हापुरातील (Kolhapur News) विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 550 कृषी सहाय्यकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. कोल्हापुरात जिल्हा कृषी कार्यालयाच्या दारात या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर जणांनी सोडला. या आंदोलनामुळे खरिपाच्या नियोजनावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक पंचनामे प्रलंबित आहेत. त्यामुळे कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षकांच्या एकाचवेळी सुरु असलेल्या आंदोलनाने मोठा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. पंचनामे तातडीने करून मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षेत असताना आंदोलन सुरु असल्याने कृषी विभाग ठप्प झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या आठवडाभरापासून हे आंदोलन सुरू असून कर्मचारी संपावर आणि खरीप नियोजन वाऱ्यावर अशी स्थिती कृषी विभागाची झाली आहे. मागण्या मान्य न झाल्यास अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनाम्यासह इतर सर्व कामे करणार नाही असा थेट इशारा कृषी सहाय्यकांनी दिला आहे.
विविध मागण्यांसाठी आंदोलन
निवेदनात कृषी सहायक कालावधी रद्द करून कृषी सहायकांना नियमित कृषी सहायक पदावर नियुक्ती द्यावी, कृषी सहायकांचे पदनाम बदलून कृषी सहायक अधिकारी असे करावे, कृषी विभागाचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन होत असतानाही कृषी सहायकांना लॅपटॉप दिला जात नाही, कृषी सहायकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस द्यावा, निविष्ठा वाटपासाठी कृषी सहायकांना वाहतूक भाड्याचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे, तरी विविध योजनेत कृषी सहायकांसाठी वाहतूक भाड्याची तरतूद करावी किंवा निविष्ठा वाटप परमिटद्वारे करावे, अशी मागणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
कृषी पर्यवेक्षकांकडूनही नियोजित आंदोलन सुरू
दरम्यान, गेल्या आठवड्याभरापासून राज्यात कृषी सहायकांचे आंदोलन सुरू असतानाच कृषी पर्यवेक्षकांकडूनही नियोजित आंदोलन सुरू झालं आहे. टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र होणार असल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अनंत देशमुख यांनी दिली आहे. राज्याच्या कृषी विभागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागातील क्षेत्रीय स्तरावर काम करणारा कृषी पर्यवेक्षक संवर्ग आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























