मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केलेल्या पुस्तकावरुन त्यांच्या वंशजावर केलेल्या टीकेनंतर आता संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी तर राऊत यांना सज्जड दम दिला आहे. आम्ही राजघराण्यात जन्मलो याचे नेमके काय पुरावे द्यायचे? असा सवाल करत आम्ही राजघराण्यात जन्माला आलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असे म्हटले आहे. हा वाद त्यांनी सुरु केला आहे, आता तो संपवायचा कसा हे त्यांनीच बघावं, असंही शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे. तर संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.

यावर बोलताना आमदार प्रसाद लाड म्हणाले की, सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करली की जनता यांच्यावर आता थुंकेल. यांच्या रक्तातच गद्दारी आहे. म्हणून लोकसभेच्या निकालानंतरच सत्तास्थापनेच्या चर्चा सुरू केल्याचं त्यांनी कबूल केलं आहे. शिवसेना एकटी लढली नसती तर 25 जागा पण निवडून आल्या नसत्या याची जाणीव त्यांना होती. म्हणून भाजपसोबत युतीत लढले. म्हणूनच 55 जागांची मजल मारू शकले, असेही ते म्हणाले. छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागितल्याप्रकरणी त्यांनी संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद? असा सवाल केला आहे.

यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, जाणता राजाची बिरुदावली छत्रपतींनाच दिली जाते. दुसऱ्यांवर आक्षेप घेतांना इतरांचे आक्षेपही कबूल केले पाहिजेत. ही दुट्टपी भूमिका आहे. इतर नेत्यांना महाराजांची उपाधी दिली तर त्याचीही चर्चा होणारच. शिव म्हणजे महाराजांशी संबंधित आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नावाबाबत उदयनराजेंची भूमिका अगदी योग्य आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा -  शिवसेना हे नाव का वापरता? ठाकरे सेना करा : उदयनराजे भोसले

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरुन भाजपवर चौफेर टीका सुरु आहे. मात्र यात आता वंशजावर टीका करणारे संजय राऊत चांगलेचं वादात सापडले आहेत. भाजपमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी राजीनामे द्यावे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेचं या पुस्तकाविरोधात महाराष्ट्रातील जनता बोलतं आहे. त्यामुळे छत्रपतींच्या गादीच्या वारसदारांनी या विषयावर बोललंच पाहिजे असं मतं संजय राऊत देखील त्यांनी व्यक्त केलं होतं.

सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे या सर्वांचा आदर आहे. त्या गाद्यांचा आम्ही सन्मान करतो. त्या सर्वांना आम्ही जर यावर भूमिका घ्या असं बोललो तर त्यात चुकीचं काय? असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केला होता. ते एवढ्यावरचं थांबले नाहीत तर त्यांनी छत्रपतींच्या वंशजांना पुरावा देखील मागितला.

छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचं दैवत, त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांचा आदर आहे, पण नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना चुकीची असल्याचं बोलत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती.



संबंधित बातम्या
UNCUT | छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाबरोबरही होऊ शकत नाही, उदयनराजेंची पत्रकार परिषद | ABP Majha 

शिवरायांसोबत मोदींची तुलना : जनता बोलतेय, छत्रपतींच्या वारसदारांनी बोललंच पाहिजे : संजय राऊत  

'जाणता राजा' फक्त छत्रपती शिवाजी महाराजच; उदयनराजेंचा पवार समर्थकांना टोला