मुंबई : बॉलिवूडची अल्पवयीन अभिनेत्री झायरा वासिमसोबत झालेल्या विनयभंग प्रकरणी विकास सचदेव या आरोपीला मुंबईतील दिंडोशी कोर्टानं पोक्सो अंतर्गत दोषी ठरवलं आहे. न्यायाधीश ए.डी. देव यांनी विकासला दोषी ठरवत 3 वर्षांची शिक्षा आणि 25 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. शिक्षेच्या सुनावणीनंतर आरोपी विकास सचदेवला 25 हजारांचा जामीन मंजूर, तसेच तीन वर्षांच्या शिक्षेलाही कोर्टाकडून स्थगिती दिली आहे.


विकास सचदेव हा व्यावसायिक असून तो एका नावाजलेल्या मनोरंजन कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. 9 डिसेंबर 2017 च्या रात्री दिल्लीहून मुंबईत येत असताना विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात विकासनं आपला विनयभंग केल्याचा आरोप या अल्पवयीन बॉलिवूड अभिनेत्रीनं केला होता. मात्र आरोपीच्या पत्नी दिव्या सचदेव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत केवळ चर्चेत राहण्यासाठी अभिनेत्रीनं हे आरोप करत केल्याचा दावा केला आहे.


विकास सचदेव यांच्या मामांचं निधन झालं होतं. त्यांच्या शोकसभेसाठी ते सकाळी पाच वाजता उठून सातच्या विमानाने दिल्लीला गेले होते. त्यानंतर रात्री 9.30 वाजताच्या विमानानं विकास परत येत होते. जवळच्या व्यक्तींना गमावल्यामुळे ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकले होते. विमानात चढल्यावर विस्ताराच्या केबिन क्रूला, मला एक चादर द्या, मला झोपायचं आहे, तसेच मला जेवणासाठीही उठवू नका," असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे झोपलेल्या व्यक्तीचा पाय पुढच्या सीटपर्यंत गेला, तर त्याला लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग म्हणायचं का?, तसेच घडलेल्या घटनेबाबत त्यांनी ताबडतोब आरडाओरडा करत क्रूला का बोलवलं नाही?, मुलगी अल्पवयीन होती मात्र तिची आईदेखील तिच्यासोबत होती. तिनं आईकडे याची तक्रार का केली नाही? आईनं याची दखल का घेतली नाही?, असा दावा सचदेव यांच्यावतीनं कोर्टात करण्यात आला.









जर कोणी पाय घासत असेल तर हालचाल दिसायला हवी, पण पीडितेनं काढलेल्या व्हिडीओमध्ये सचदेव यांचा पाय स्थिर असल्याचं दिसत आहे. असा दावा करत विकास सचदेव यांनी कोर्टाला सांगितलं की, विमान लॅण्ड होताना, अभिनेत्री म्हणाली होती की, तुम्ही तुमचे पाय माझ्या डोक्यावर का ठेवत नाही? यावर विकास सचेदव तिला म्हणाले की, "मॅडम मी गाढ झोपेत होतो. त्यामुळे मला समजलं नाही, जर तुम्हाला त्रास झाला असेल तर. मी माफी मागतो. तुम्हाला त्रास देण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता".

मात्र झायरानं कोर्टाला सांगितलं की, "सुरुवातीला विमान हेलकावे खात असल्याच्या कारणावरुन आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर विमानातील दिवे बंद होताच त्यानं पुन्हा असभ्य वर्तन केलं. तेव्हा मी व्हिडीओ काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र लाईटच्या कमतरतेमुळे ते शक्य झालं नाही. सीटच्या मागून हा इसम माझ्या पाठीला आणि मानेला पाय लावत होता. क्रू मेंबर्सकडे याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही दाद न दिल्यामुळे मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सोशल मीडियावरून आपली व्यथा मांडली. घडलेला प्रकार पाहता देशातील मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का?" असा सवाल तिनं उपस्थित केला होता.
या संपूर्ण प्रकाराची मुंबई पोलिसांसह महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली होती. तर विस्तारा एअरलाईन्सनंही याबाबत दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.


संबंधित बातम्या