भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी : नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन प्रचंड वाद झाला. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी याबाबत बोलावं अशी मागणी केली होती. यावरुन छत्रपती संभाजीराजे आणि राऊत यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. त्यानंतर आज उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडत शिवसेनेवर टीका केली.
शिवाजी महाराजांच्या नावाचं फक्त राजकारणच सुरु आहे, असंही उदयनराजे म्हणाले. शिवसेनेवर टीका करताना उदयनराजे म्हणाले की, "शिवसेनेच्या नावाला आम्ही कधी आक्षेप घेतला नाही. पण शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारलं होतं का? या पत्रकार परिषदेत मुंबईतील शिवसेना भवनचा फोटो दाखवत यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कुठे आणि शिवाजी महाराजांचा कुठे आहे? असा प्रश्न विचारला. तसंच शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील आमदार गजभिये मुजरा करत असतानाचा फोटो दाखवत, याचं उत्तर द्यावं लागेल असंही म्हटलं.
याशिवाय वड्याला शिववडा हे नाव देण्यावरुन, तीन शिवजयंती साजरी करण्यावरुन उदयनराजेंनी नाराजी व्यक्त केली. शिववडा हे नाव का दिलं? तीन शिवजयंती का करता? महाराजांची अजून किती मानहानी करणार असा प्रश्न त्यांनी विचारला.
"महाराजांचं नाव काढलं तर त्या हिशेबाने वागा, नाहीतर त्यांचं नाव घेऊ नका. गलिच्छ राजकारणाचं खापर फोडायचं प्रयत्न करु नका. समज देतोय नाहीतर परिणामाला सामोरं जावंच लागेल," असा इशारा उदयनराजेंनी दिला. तसंच मी जनतेला सांगू इच्छितो शिवाजी महाराज फक्त आमच्या कुटुंबाचे नाहीत, ते तुमचेही आहेत. तुम्ही सुद्धा त्यांच्या विचारांचे वारस आहात, असंही त्यांनी सांगितलं.