(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sadak 2 Review | वेड्यांचा बाजार!
Sadak 2 Review : या 'सडक'वरून जाणारी गाडी पकडाल तर गाडी पलटी होणार हे नक्की आहे. ती गाडी पलटी झाली तर हा सिनेमा पाहणारा जखमी होणार आहे. आणि गंमत अशी की जखमी अवस्थेत तुम्ही जेव्हा गाडीतून बाहेर याल तेव्हा या गाडीचा ड्रायव्हर फरार असणार आहे.
महेश भट्ट
संजय दत्त, आलिया, आदित्य रॉय कपूर, मकरंद देशपांडे
सिनेमाचा ट्रेलर आला तेव्हाच हा सिनेमा कसा असू शकेल याचा अंदाज आला होता. पण बऱ्याचदा ट्रेलर चांगला असतो पण सिनेमा खराब असतो. तसंच उलटंही होऊ शकतं. ट्रेलर फार वाईट कापला जाऊ शकतो पण सिनेमा मात्र तितका वाईट नसू शकतो. ही शक्यता झाली. म्हणून सिनेमा बघायच्या आधीच सिनेमावर मत व्यक्त करू नये असं म्हणतात. पण सडक 2 मात्र त्याबाबतीत प्रामाणिक आहे. म्हणजे ट्रेलरमध्ये जे दिसलं.. जसं दिसलं आणि त्या ट्रेलरवरून आपण जो अंदाज बांधला तो अंदाज हा चित्रपट तंतोतंत खरा ठरवतो. सडक 2 हा सिनेमा अक्षरश: वेड्यांचा बाजार आहे. खरोखर सिनेमातली सगळ्या व्यक्तिरेखा वेड्या आहेत. संपूर्ण चित्रपटात केव्हा ना केव्हा तरी ही माणसं वेडेपणा करतात. म्हणूनच सिनेमा बघून झाल्यानंतर वेड्यांच्या बाजारातून आपण सुखरूप बाहेर पडल्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावर आपोआप झळकू लागतं.
खरंतर महेश भट्ट हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव. आत्ता त्यांचं नाव खूप वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येतं आहे तो भाग सोडूया. पण भट्ट यांनी अनेक चांगले सिनेमे दिले.. अनेक चांगल्या सिनेमाची निर्मिती केली. सारांश, हम है राही प्यार के, दिल है के मानता नही, सडक, जख्म असे अनेक. शिवाय त्यांनी टीव्हीही गाजवला. आता असा माणूस इतक्या वर्षांनी सिनेमा करतोय म्हटल्यावर निदान किमान अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करेल अशी भाबडी आशा बाळगली जात होती. पण त्या सगळ्या आशेला या सडक 2 चित्रपटाने सुरुंग लावला आहे. यातून हे लक्षात येतं की महेश भट्ट यांना जसा सिनेमा दिसतोय तो ट्रेंड आता लयाला गेला आहे. आता खूप नव्या पद्धतीने सिनेमा हाताळला जातोय आणि तो भट्ट साहेबांचा प्रांत नाही. सुमार गोष्ट.. सुमार पटकथा. अत्यंत तोकडे संवाद आणि त्याहीपेक्षा त्यातल्या सतत वेड्याचा झटका येणाऱ्या व्यक्तिरेखा. या सिनेमात दिसणारा एकही जण निदान किमान शहाणा नाही. या सिनेमातला रवी, योगेश, आर्या, विशाल, महाराज, नंदिनी अशा सगळ्या सगळ्या व्यक्तिरेखा पूर्ण वेडगळ आहेत.
सिनेमाची गोष्ट ऐकाल थर थक्क व्हायला होईल. अर्थातच पूर्ण गोष्ट सांंगण्याचा मुद्दा इथे नाही. तर आर्या ही योगेश देसाई या अत्यंत धनाढ्य व्यापाऱ्याची मुलगी. तिला वेड्याचे झटके येतातय. तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याच रुग्णालयात रवी येतो. रवीला त्याची पत्नी पूजा तीन महिन्यांपूर्वीच सोडून गेली आहे. पण ती गेल्यानंतर त्याचा जगण्यातला रस संपला आहे. त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला आहे. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी त्याचा मित्र त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. तिथे तो पहिल्यांदा आर्याला पाहातो. रवी रुग्णालयात थांबायचं नाकारतो. घरी येतो. इकडे आर्या रुग्णालयातून पळून जाते आणि आपल्या ठरल्या नियोजनाप्रमाणे कैलासला जाण्यासाठी आधीच बुक करून ठेवलेल्या टॅक्सीवाल्याकडे येते. तो टॅक्सीवाला रवी असतो. मग रवीचा आणि आर्याचा प्रवास सुरू होतो. त्यात त्यांना वाटेत विशाल भेटतो. जो आर्याचा बॉयफ्रेंड असतो. आणि मग सिनेमा पुढे पुढे जातो. पण गंमत अशी की सिनेमाचं नाव सडक असूनही तो कधीच ठरलेल्या रस्त्यावरून चालत नाही. कुठल्याही व्यक्तिरेखा कुठेही येतात. पोलीस कमिशनर एकदम हवालदारासारखा वाटू लागतो. विशाल, नंदिनी यांना अचानक उपरती होते. एका क्षणात रवी योगेशच्या घरी पोचतो. देवा, प्रवासासाठी बाहेर पडलेली ही मंडळी कशी उलटीसुलटी फिरतायत ते पाहताना डोकं गरगरू लागतं. त्यात ते संजूबाबाचे गुटगुटीत डोळे पटकन खाली पडतात की काय इतके बाहेर येऊन थबकलेले असतात. रवी झालेला संजय दत्त, आर्या झालेली आलिया, विशाल बनलेला आदित्य रॉय कपूर, महाराज बनलेले मकरंद देशपांडे हे दिलेल्या भूमिका पार पाडत रहातात पण या सगळ्या मामल्याचा पार भुसा झालेला आपण आपल्या डोळ्यांनी पाहात राहतो. मग त्या थ्री इडियटसमधल्या सरांप्रमाणे एकच प्रश्न आपल्या मनात येतो, भाई कहना क्या चाहते हो?
विनाकराण आणलेली गूढता.. व्यक्तिरेखांची लावलेली वाट.. मधूनच डोकावणारी पूजा भट्ट.. सिनेमाभर बिनडोक मुलासारखा वावरणारा विशाल झालेला आणि यातला क्लायमॅक्स डोक्यावर ओढणी घेऊन शेवटी प्रगट झालेले महाराज.. अरे देवा.. या सिनेमातली गाणी.. त्याचं संगीत.. हेही बघवत नाही. सडक 2 मधली फक्त गाणीच एकदा ऐकून बघितली तर कदाचित श्रवणीय वाटतीलही ती. पण सिनेमात मात्र या सडकला सुरुंग लावण्याचं काम ती करत असतात. त्यातच भोंदू बाबांबद्दल आर्याने चालवलेली मोहीम दिसत राहाते.. त्याचाही संदर्भ पुढे कुठेच नाही. जगण्याचं मरण्याचं तत्वज्ञान अधूनमधून भट्ट साहेब पाजत राहातात. पण त्यासाठी त्यांचं इन्स्टा अकाऊंट आहेच की. सिनेमा बघायची गरज नाही. असो.
हा प्रयत्न फसला आहे. या 'सडक'वरून जाणारी गाडी पकडाल तर गाडी पलटी होणार हे नक्की आहे. ती गाडी पलटी झाली तर हा सिनेमा पाहणारा जखमी होणार आहे. आणि गंमत अशी की जखमी अवस्थेत तुम्ही जेव्हा गाडीतून बाहेर याल तेव्हा या गाडीचा ड्रायव्हर फरार असणार आहे. म्हणूनच या सडक 2 ला मिळतोय केवळ एक स्टार. तेही या सिनेमात वापरेली ऑडी कार तेवढीच एक स्वच्छ सुंदर नेटकी आणि शहाणी आहे म्हणून!