OMG 2 Movie Review : विद्यार्थांना लैगिंक शिक्षणासंदर्भात माहिती देणं गरजेचं आहे का? यावर भाष्य करणारा अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हा सिनेमा आहे. 'ओएमजी 2' या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पण वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


'ओएमजी 2'चं कथानक काय आहे? (OMG 2 Story)


'ओएमजी 2' या सिनेमाचं कथानक शिवभक्त कांती शरण मुदगल म्हणजे पंकज त्रिपाठीभोवती (Pankaj Tripathi) फिरणारं आहे. कांती यांच्या मुलाचा शाळेतील टॉयलेटमधला हस्तमैथुन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. त्यामुळे त्याला शाळेतूनही काढून टाकले जाते. कांती सुरुवातीला आपल्या लाडक्या लेकालाच दोष देतात. कांती यांची महादेवावर प्रचंड श्रद्धा असते. त्यामुळे सर्व गोष्टी ठिक व्हाव्यात यासाठी ते प्रार्थना करतात. दरम्यान महादेवाच्या रुपात अक्षय कुमारची (Akshay Kumar) एन्ट्री होते आणि सिनेमाचं कथानक पुढे सरकतं. 


शिवाचा दूत बनलेला अक्षय कुमार कांतीला थांबवतो. त्यानंतर कांती शाळेविरुद्ध कोर्टात तक्रार दाखल करतो. शाळेने लैंगिक शिक्षणासंदर्भात योग्य पद्धतीने माहिती न दिल्याने त्यांच्या मुलाने हे पाऊल उचलले असं ते म्हणतात. दरम्यान त्यांच्या विरोधात यामी गौतम (Yami gautam) केस लढते. आता सिनेमात पुढे काय घडणार? खिलाडी कुमार कांतीला कशी मदत करणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमाच पाहावा लागेल.


सर्वच कलाकारांचा दमदार अभिनय...


शिवाचा दूत म्हणून अक्षय कुमारने चांगलं काम केलं आहे. सिनेमात अक्षयची भूमिका छोटी असली तरी त्याने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे आणि हीच त्याच्या भूमिकेची खासियत आहे. तर दुसरीकडे दमदार अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकज त्रिपाठीने कांती शरणच्या भूमिकेतदेखील 100% दिले आहेत. यामी गौतमनेदेखील (Yami gautam) आपली भूमिका चोख निभावली आहे. पवन मल्होत्राने न्यायाधीशाची भूमिका उत्तम वठवली आहे. पंकज त्रिपाठी यांच्या पत्नी आणि मुलांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनीही चांगलं काम केलं आहे.


'ओएमजी 2' कसा आहे? 


'ओएमजी 2' हा सिनेमा खूपच विलक्षण आहे. पहिल्या फ्रेमपासूनच सिनेमा प्रेक्षकांना बांधून ठेवतो. सिनेमाची गती योग्य आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन होत नाही असा एकही सीन सिनेमात नाही. एकीकडे हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. तर दुसरीकडे समाजाने निर्माण केलेल्या चुकीच्या पद्धती प्रेक्षकांना दुखावतात. 'ओएमजी 2' या सिनेमात ए सर्टिफिकेट देण्यात आले आहे. पण सिनेमा लैंगिक शिक्षणावर भाष्य करणारा आहे. त्यामुळे विद्यार्थांनी हा सिनेमा पाहायलाच हवा, असं वाटतं.


अमित राय यांचे दिग्दर्शन खूप चांगले आहे. सिनेमासाठी त्यांनी घेतलेली मेहनत सिनेमा पाहताना दिसून येते. अमित राय यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. या सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लेखन आणि यासाठी लेखकाचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे.


'ओएमजी 2' हा परिपूर्ण सिनेमा नसला तरी अलीकडच्या काळातील सर्वात उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहायलाच हवा. हा सिनेमा तुम्हाला खूप काही शिकवून जाईल.