Akshay Kumar OMG 2 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'ओह माय गॉड 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकला होता. सेन्सॉरने या सिनेमातील तब्बल 20 दृश्यांवर कात्री लावली आहे. पण आता सेन्सॉरने या सिनेमाला 'A' सर्टिफिकेट दिलं आहे. त्यामुळे 11 ऑगस्टला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
'ओएमजी 2' या सिनेमाचं कथानक होबोफोबियावर आधारित आहे. त्यात लैंगिक शिक्षणाचाही भाग असल्याचं समोर आलं होतं. या सिनेमाच्या कथेतील मुलगा समलैंगिकतेच्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्या करतो. त्यानंतर शिवभक्त असलेले पंकज त्रिपाठी लोकांना होमोफोबियाबद्दल जागरूक करण्याचा वसा घेतात.
'ओह माय गॉड 2' हा सिनेमाला सर्टिफिकेट देण्यास बोर्डाने आधी नकार दिला होता. पुढे कमिटीने निर्मात्यांनी 20 कट्स सुचवले. तसेच लैंगिक शिक्षणाचा मुद्दा आल्याने आणि सिनेमातील काही दृश्यांमुळे 'ओह माय गॉड 2' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने A सर्टिफिकेट म्हणजेच अडल्ट सर्टिफिकेट दिलं आहे. त्यामुळे आता हा सिनेमा फक्त प्रौढांनाच पाहता येणार आहे.
सेन्सॉरने सुचवलेले 'हे' 20 कट्स निर्मात्यांनी बदलले
1. सिनेमातील एका दृश्यात शिवाचा एक दूत नशा करताना दिसत होते. ते दृश्य आता बदलण्यात आलं आहे.
2. सिनेमातील फ्रंटल नग्नतेची दृश्ये काढून त्याजागी नागा साधूंची दृश्ये लावण्यात आली आहेत.
3. मंदिरातील महिलांना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह घोषणेशी संबंधित संवाद बदलण्यात आले आहेत.
4. एबीपी न्यूजच्या माहितीनुसार, 'ओएमजी 2' या सिनेमाचं कथानक उज्जैनमधील एक काल्पनिक कथानक आहे. पण या सिनेमात लैंगिक शिक्षणासारख्या विषयावर भाष्य करण्यात येत असल्याने सिनेमातील ठिकाणाचं नाव बदलून ते काल्पनिक नाव ठेवण्यात आलं आहे.
5. सिनेमातील शाळेचं नाव बदलून ते 'सवोदय' असं ठेवण्यात आलं आहे.
6. सिनेमात देवाला प्रसाद म्हणून व्हिस्की, रम सारख्या शब्दांचा वापर करण्यात आला होता. आता ते काढून टाकून 'वहान मदीरा चधे है...' हा संवाद ठेवण्यात आला आहे.
7. सिनेमात 'लिंग' हा शब्द वापरण्याऐवजी 'शिवलिंग' किंवा 'शिव' असे शब्द वापरण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत.
8. 'शिव जी के लिंग', 'अश्लीलता', 'तू अश्लील बोलत आहेस, असे सिनेमातील अनेक संवाद आणि शब्द काढून टाकण्यात आले आहेत.
9. सेक्सोलॉजिस्ट डॉ. प्रकाश कोठारी या सिनेमात हस्तमैथुनाबद्दल सविस्तर बोलताना दाखवण्यात आले होते. पण आता सेन्सॉर बोर्डाने त्यांच्या संवादात काही बदल केला आहे.
10. हस्तमैथुनासाठी वापरला जाणारा 'हराम' या शब्दाऐवजी 'पाप' या शब्द ठेवण्यात आला आहे.
11. NCPCR च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एका अल्पवयीन मुलाकडून लैंगिक कृत्य केल्याच्या दृश्यात सिनेमात आवश्यक बदल करण्यात आले आहेत.
12. सेक्ससंबंधित संवाद आणि दृश्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.
13. शिव दूताने म्हटलेल्या 'मैं टांग क्यूं अडाऊं...' या संवादातही बदल करण्यात आला आहे.
14. शिव दूत अध्यात्मात मग्न होऊन स्नान करतानाच्या दृश्यांमध्येही बदल करण्यात आला आहे.
15. सिनेमातील 'बड़े बाल देखकर... रुपये मिलेंगे' हा संवादही बदलण्यात आला आहे.
16. सिनेमात एका ठिकाणी 'हाय कोर्ट... मजा आएगा' असा संवाद आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने या संवादात बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
17. 'महिला की योनी... हवन कुंड है' सिनेमातील अशा प्रकारच्या संवादांमध्ये बदल करण्यास सांगितले आहेत.
18. न्यायालयातील न्यायाधीश सेल्फी काढतानाचे दृश्यही हटवण्यात आले आहे.
19. सिनेमातील 'सत्यम शिवम सुंदरम' सारखे संवादही काढून टाकण्यात आले आहेत.
20. धार्मिक भावनांचा आदर करत सिनेमात बदल करण्यात आले आहेत.
'ओह माय गॉड 2' च्या निर्मात्यांना कोणत्याही कट आणि बदलांशिवाय सिनेमाला U/A सर्टिफिकेट मिळवायचे होते, जे सेन्सॉर बोर्डाने स्पष्टपणे नाकारले. पण आता निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाने सांगितलेल्या गोष्टींचे बदल करत सिनेमाला मिळालेलं 'A' सर्टिफिकेट मान्य केलं आहे.
संबंधित बातम्या