Doctor G Review : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. आयुष्मान नेहमीच हटके विषयांवरील भूमिका निवडतो. ‘विकी डोनर’, ‘बाला’नंतर पुन्हा एकदा आयुष्मान एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज (14 ऑक्टोबर) त्याचा ‘डॉक्टर जी’ (Doctor G) हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्याने नेहमीच प्रेक्षकांना मनोरंजनात नाविन्य देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच त्याच्या या चित्रपटाकडून देखील चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘डॉक्टर जी’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.



‘डॉक्टर जी’ या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुरानासह अभिनेत्री रकुलप्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि शेफाली शहा (Shefali Shah) देखील मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत. या चित्रपटातून देखील आयुष्मान एक नवी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चला तर जाणून घेऊया कसा आहे हा चित्रपट...


काय आहे कथानक?


‘डॉक्टर जी’ या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना हा स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणजेच महिलांशी संबंधित समस्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची भूमिका साकारत आहे. आता या पुरुष डॉक्टरला महिलांवर उपचार करावे लागत आहेत. या दरम्यान त्याला येणाऱ्या अडचणी हीच या चित्रपटाची कथा आहे. सुरुवातीला आयुष्मानला हाडांचा डॉक्टर व्हायचे असते. मात्र, आखी कारणांमुळे त्याला स्त्रीरोग विभागात प्रवेश घ्यावा लागतो. तो प्रवेश तर घेतो, पण मनासारखा विषय न मिळाल्याने वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिकू लागतो. तर, पुढच्या वर्षी आपण पुन्हा परीक्षा देऊ आणि आपली ऑर्थोमध्ये निवड होईल, अशी आशा देखील तो मनाशी बाळगतो.


मात्र, इथे त्याला रॅगिंगसारख्या समस्येला तोंड द्यावं लागतं. त्यांच्यासमोर इतरही अनेक समस्या येतात. मात्र, चित्रपटात पुढे तो त्याचे हे प्रोफेशन कसे स्वीकारतो हे दाखवण्यात आले आहे. कथेतील आणखी एक असा ट्रॅक आहे, जो प्रेक्षकांना खूप भावूक करतो. चित्रपटाची कथा चांगली आहे आणि ती चांगल्याप्रकारे मांडण्यात आली आहे.


कलाकारांचा जबरदस्त अभिनय


अभिनेता आयुष्मान खुरानाने नेहमीप्रमाणेच या चित्रपटातही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्याने या चित्रपटातही अप्रतिम काम केले आहे. ‘डॉ. उदय गुप्ता’ या पात्रात तो अगदी खराखुरा डॉक्टर वाटला आहे. त्याच्या भूमिकेत आणि अभिनयात कुठेही नाटकीपणा नाही. गोष्टीत कुठेही ड्रामा न वाटता सगळे खरे वाटते आणि पाहणारा प्रेक्षक चित्रपटाशी कनेक्ट होतो. चित्रपटात अभिनेत्री शेफाली शाह आयुष्मानची सिनियर झाली आहे. तिला पाहून खरंच असे वाटते की, ती सिनियर डॉक्टर आहे. तिचे काम चोख आहे. शेफालीने तिच्या चेहऱ्यावर सिनिअर असल्याचा भाव व्यवस्थित दाखवला आहे. अभिनेत्री रकुलप्रीत सिंहही एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसली आहे. चित्रपटात लव्हस्टोरीचा ट्रॅकही आहे, मात्र त्यात थोडा ट्वीस्ट आहे. शीबा चढ्ढा आयुष्मानच्या आईच्या भूमिकेत असून, त्यांनीही सुंदर अभिनय केला आहे. वृद्ध महिलांना स्वतंत्रपणे त्यांचे जीवन जगण्याचा अधिकार नाही का? हा प्रश्न त्यांनी खूप छान मांडला आहे. चित्रपटात त्यांची भूमिका देखील वेगळी आहे.


का बघाल चित्रपट?


या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यपने केले आहे. अनुभूती ही दिग्दर्शक अनुराग कश्यपची बहीण आहे. तिने या आधी ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘देव डी’सारख्या चित्रपटात असिस्टंट म्हणून काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. अतिशय विनोदी पद्तीने एका गंभीर विषयावर यातून भाष्य करण्यात आलं आहे.


चित्रपटाचे म्युझिकही चांगलं आणि चित्रपटाच्या गतीला साजेसे आहे. तर, यातील गाणी देखील कथेशी एकरूप होणारी आहेत. चित्रपट पाहताना कुठेही कंटाळा येत नाही. एकंदरीत हा चित्रपट अतिशय चांगल्याप्रकारे मांडण्यात आला आहे. तुम्ही जर, आयुष्मान खुरानाच्या हटके शैलीतील चित्रपटांचे फॅन असाल, तर हा चित्रपट अजिबात चुकवू नका.


हेही वाचा :


Doctor G Trailer : एका स्त्रीरोग तज्ज्ञचा संघर्ष; आयुष्मान खुरानाच्या 'डॉक्टर जी' चा ट्रेलर रिलीज