Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. सध्या ही लोकप्रिय मालिका सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. आता या मालिकेत ‘दया बेन’ साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानीला (Disha Vakani) कर्करोगाची लागण झाल्याच्या अफवांना पेव फुटला आहे. या चर्चांमुळे सध्या अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली आहे. एकीकडे प्रेक्षक दिशा मालिकेत परतेल याची वाट बघत होते. तर, या अफवेमुळे सगळेच चाहते नाराज झाले आहेत. काही वृत्तांमध्ये दिशाला ‘दया बेन’चा विशिष्ट आवाज काढल्यामुळे घशाचा कॅन्सर झाल्याचे म्हटले गेले होते. ज्यावर या मालिकेचे दिग्दर्शक संतापले आहेत.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दिशा वकानी 2017मध्ये मॅटर्निटी लीव्हवर गेली होती. त्यानंतर दिशा अद्याप शोमध्ये परतलेली नाही. अनेकवेळा तिच्या परतीच्या बातम्या आल्या, पण दिशा पुन्हा मालिकेत आलीच नाही. आता अभिनेत्रीच्या तब्येतीच्या अफवा उठल्यानंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे दिग्दर्शक मालव राजदा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून अशा बातम्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
दिशाला कॅन्सर ही केवळ अफवा!
दिशाचा रील आणि रीअल भाऊ-अभिनेता मयूर वकानी यानी या बातम्या आधीच निराधार असल्याचे म्हटले होते. तर, आता मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी दिशाच्या घशाच्या कॅन्सरच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आणि चुकीच्या रिपोर्टिंगबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मालव यांनी एका बातमीचे शीर्षक सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यात असा दावा केला गेला आहे की, दयाबेनसाठी शोमध्ये ज्या प्रकारचा आवाज काढावा लागत होता, त्यामुळे दिशाला घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे.
काही लोक इतके बेजबाबदार कसे होऊ शकतात?
मालव यांनी बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जेठालाल म्हणतो त्याप्रमाणे...नॉनसेन्स... बातम्या देणे हे एक जबाबदार काम आहे. काही लोक इतके बेजबाबदार कसे होऊ शकतात, याचं मला खरोखरच आश्चर्य वाटलं. यार ही एवढी मोठी बातमी आहे, निदान तपासून तरी घ्या. याचा परिणाम बर्याच लोकांवर होऊ शकतो. खात्री असल्याशिवाय अशा प्रकारच्या बातम्या का छापल्या जातात. चाहत्यांच्या माहितीसाठी सांगतो ही पूर्णपणे चुकीची बातमी आहे.’
पाहा पोस्ट :
यावर आपली प्रतिक्रिया देताना ‘जेठालाल’ फेम अभिनेते दिलीप जोशी म्हणाले की, 'मलाही हेच विचारण्यासाठी सतत फोन येत आहेत. वेळोवेळी काही ना काही मजेदार बातम्या येत असतात. मला वाटतं त्यांना आणखी बढावा देण्याची गरज नाही. मी एवढेच म्हणेन की, या सर्व अफवा आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.'
हेही वाचा :
Disha Vakani: दयाबेनला कॅन्सरची लागण? सुंदर अन् जेठालालनं दिली प्रतिक्रिया