Avatar 2 Review : आपण सगळे कित्येक वर्षांपासूनच्या मॅजिकल मास्टरपीस ठरलेल्या 'अवतार' चित्रपटाच्या सिक्वेलची वाट बघत होतो.  येणाऱ्या सिनेमाची लागलेली उत्कंठा, सिनेमा का पहावा? अवतार (Avatar) ने काय दिलं हे थोडक्यात जाणून घेऊयात... 


हा सिनेमा श्वास रोखून समुद्री सफर कशी करावी हे आपोआपच शिकवेल. तेरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अवतार (Avatar)ची तुलना याच सिनेमाचा सीक्वल् Avatar The Way of Water सोबत होणं स्वाभाविक होतंच. जशी बाहुबली चित्रपटाची त्याच्या सीक्वलसोबत तुलना झालेली तसंच काहीसं अवतारसोबत घडत आहे. 


अवतारचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. कदाचित अवतारचं नवं युनिव्हर्स दिग्दर्शक जेम्स् कॅमेरॉन  (James Cameron) आगामी सिनेमाच्या सिरीज मधून घेऊन येतील, अशा  चर्चा रंगलेल्या आहेतच मात्र अवतारची मालिका मल्टिव्हर्सकडे वळेल का ते पाहायला आपण सगळे उत्सुक आहोत.  पहिल्या अवतारचा प्लॉट जिथं संपतो तिथूनच 'अवतार - द वे ऑफ वॉटर' चा स्क्रिनप्ले सुरू होतो. अवतार आपलाच रेकॉर्ड तोडेल का हा प्रश्न बिनबुडाचा वाटतो कारण अवतार हा सिनेमा स्वतःच एक रेकॉर्ड आहे. अवतारचा दुसरा भाग यायला तब्बल तेरा वर्षांची वाट पाहावी लागली हे खरंय...


न भूतो न भविष्यती, याची देही याची डोळा, अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे Spectacular Stunning Beautiful Visuals cinematic Experience हे सगळं पडद्यावर पाहताना अद्भुत दुनियेशी आपली नाळ जोडली जाते, अविस्मरणीय अनुभूती मिळते आणि या दुनियेचा आपणही भाग असावं एवढं वेड या सिनेमाने लावलंय.


2022 ची सुरुवात एसएस राजामामौलींच्या RRR ने झाली  तर वर्षाचा शेवट हा जेम्स कॅमेरॉन यांच्या  अवतार या चित्रपटानं झाला. जवळपास पहिल्या अवतार सारखीच मिळती जुळती गोष्ट बऱ्याच Science fiction सिनेमात पाहायला मिळालेली. ट्रान्सफॉर्मर, पॅसिफिक रिम सोबतच How to Train your Dragon सारखा Animated सिनेमा प्रेक्षकांच्या मनात उतरलेला होता.पण अवतार 2 चा क्लायमॅक्स सीन हा टायटॅनिक सारखा असल्यासारखा वाटला. 


'अवतार' म्हणजे काय? 
तुम्ही पहिला अवतार पाहिलेला नसेल तर अजिबातच टेन्शन घ्यायची गरज नाहीये.  अवतार- 2 हा आधीच्या सिनेमाची कथा पुढे घेऊन जातोय तरी थोडंसं मागे डोकावून बघूया. पहिला अवतार हा 2009 मध्ये भेटीला आलेला.तेव्हाचं पृथ्वीवरील जीवन जवळपास 2145 वर्ष पुढंचं दाखवलं होतं. तेव्हा सगळं हायटेक जीवनमान होतं. पृथ्वी वरून कोणत्याही ग्रहावर येणं-जाणं, खानपान सगळं एकदम सोप्पं होतं आणि याच पृथ्वी वरील लालची मानव म्हणजेच पृथ्वीवासी  प्लॅनेट 'पॅन्डोरा' वरून एक महागडा मौल्यवान खनिज (Unobtanium) मिळवण्यासाठी खुरापात्या करत असतात. 'पॅन्डोरा' चं जग किती गूढ संकल्पेत विस्तृत दाखवण्यासाठी दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी प्रचंड मेहनत घेतलेली दिसते, पॅन्डोराचं जंगल, जैव विविधता,  वेगवेगळे प्राणी या सगळ्यांचं कनेक्शन दाखवलं होतं. यासाठी किती खर्च आला, किती वेळ लागला हे लक्षात येऊ शकतं.


'नावी' आणि माणसांचा DNA मिळवून अगदी हुबेहूब नावी प्रजाती साखरे क्लोन पृथ्वीवरून आलेले सैनिक आणि वैज्ञानिक तयार करतात आणि त्यांना नाव 'अवतार'  दिलं जातं. पृथ्वीवरील ठराविक सैनिकांचं मन हे टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून त्या अवतार मध्ये ट्रान्स्फर करून या अवतारांना पॅन्डोराच्या नावी लोकांमध्ये मिसळून तिथली सगळी माहिती वैज्ञानिकांना द्यायला मदत हे अवतार करत असतात.  यातच कथेचा नायक ठरलेला जेक सुली (Sam Wothington)  हा नौसेनेचा अपंग सैनिक असतो मात्र त्याला अवतार च्या रुपात  ट्रान्सफॉर्म केल्यावर त्याला आनंद होतो कारण त्याला चालता पळता येऊ लागतं,  जेक सुली जेव्हा पॅन्डोरा वर रिसर्चला फिरत असतो. जेक हा नावींच्या दुनियेत रममाण होऊन जातो,  पॅन्डोरा च्या प्रेमात पडतो, जेक मानवी जीवन सोडून तिथला 'नावी' होयचा निर्णय घेतो. नंतर सैनिक आणि नावींवासीय संघर्ष सुरू होतो, यातच कर्नलचा (Stephen Lang) न्येतिरीकडून खात्मा होतो असा पहिला अवतार आपण सिनेमागृहात पाहिला होता. 


कसा आहे द वे ऑफ वॉटर
सिनेमा नातेसंबंध उलगडतो, सिनेमा एकत्र कुटुंब पद्धतीवर भाष्य करतो, तेरा वर्षात तयार झालेला तीन तासांचा लांबलचक सिनेमा बघताना एकही मिनिट पडद्यावरची नजर हटत नाही. सिनेमाचा प्लॉट तीन भागात असलेला लक्षात येतो.   कथेत हिरव्यागार पॅन्डोराचा जंगलवासी जेक हा नावींच्या समूहाचा प्रमुख आहे, नावींच्या रक्षणाची जबाबदारी जेक वर आहे. जेकला तीन मुलं असल्याचं पाहायला मिळतं. पहिला न्येयतामृ, दुसरा लोअक तर सर्वात लहान मुलगा टुक. शिवाय आजून एक दत्तक मुलगी किरी आणि  मानव असलेला 'स्पायडर'  असं जेकचं कुटुंब पाहायला मिळतं.  स्पायडर आणि किरी कोण आहेत? हे ज्यांनी जुना अवतार पाहिला त्यांना लक्षात येईलच....


 आकाशवासीय सैनिक पॅन्डोराला पुन्हा जेकला शोधत येतात आणि जेक सुली (Sam Wothington) या सगळ्यातून आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी महाकाय टूलकुन (Tulkun) माशांसोबत आत्मीय जिव्हाळा असणाऱ्या मेटकायीनवासीयच्या मुख्य टोनोवरी म्हणजेच (Cliff Curtis), आणि त्याची राणी रॉनलकडे आश्रयास जातात.


ज्याप्रमाणे जेकचं जंगल हे गूढ होतं तसंच हे समुद्र किनारी राहणारे  मेटकायीन लोकं तिथलं राहणीमान कसं असतं? हे शिकवतात असं सगळं जंगल टू समुद्र असा प्रवास, 3D गॉगल्स लावून  पाहायला खूप खरोखर वाटतं. मग हवेतल्या जेक आणि त्याच्या परिवाराच्या माकडउड्या ते त्यांनी समुद्रात खोल मारलेली सूर, पाण्यातल्या प्राण्यांशी जोडलेलं नातं, जेक चा परिवार आणि मेटकायीन च्या मुख्या सोबत झालेले मैत्रीसंबंध फुलत जातात. असा दुसरा भाग आपल्याला पाहायला मिळतो.


'स्पायडर' च्या मदतीने आकाशवासीय सैनिक पॅन्डोरामध्ये कसं राहायचं ते नावींच्या रुपात सगळं शिकून घेतात आणि पॅन्डोरा वरती महाकाय टूलकुन माश्यांची (Tulkun) शिकार करणाऱ्या आकाशवासीय सैनिकांच्या सोबतीने शोध घेत जेक पर्यंत पोहोचतात.  जेक-सलीला आपल्या परिवारात काय गमवावं लागतं, एक कुटुंब प्रमुख वडील हे नाते आपल्या मुलांना तो कसं जपतो. जेक त्याचं कुटुंब मेटकायीनवासीयांच्या सोबत सैनिकांशी जबरदस्त  युद्ध करताना पाहायला मिळतं, जो अनुभव पुढं जे काही होतं ते पाहायला सिनेमगृहात नक्की जायला हवं.


अवतार 2 सिनेमाची कथा अगदी टिपिकल बॉलिवूड सिनेमांसारखी रचली गेल्याचं जाणवलं, सिनेमाच्या कथेत फारसं नावीन्य असल्याचं पाहायला मिळालं नाही. 
'अवतार' चा पहिला भाग आणि त्यासारखेच व्हिज्युअल्स् ग्राफीक्स असलेल्या अवतार 2 मध्ये  महाकाय टूलकुन माश्यांची शिकार, सिनेमाचा बॅकग्राऊंड स्कोर, अंडर वॉटर लोकेशन्स,
थ्रिलिंग सीन्स, साहसी दृश्य सोडले तर जंगल आणि पाणी यात म्हणावं तेवढं मन रमत नाही. 

एक काळ होता जेव्हा, Lord of the Rings सारखे तीन तासांचे सिनेमे असायचे अन प्रेक्षक ते आवर्जून पहायचे सुद्धा.
मात्र हल्ली क्रिकेटमध्ये कसोटी ते 20-20 बदल झाला तसा दीड तासांत सिनेमा दाखवता आला असता.
काळानुसार गणित बदलणं अपेक्षित होतं जिथे चित्रपट कंटाळवाणा होतो. 'अवतार' ला मी देतोय 4 स्टार!

वाचा इतर चित्रपटांचे रिव्ह्यू: 

Troll Movie Review:  आक्राळ विक्राळ क्रियेचर 'ट्रोल'


India Lock down Movie Review : लॉकडाऊनची झळ न पोहोचलेला 'इंडिया लॉकडाऊन' सिनेमा...