सगळं सुरळीत सुरू असताना कोरोनाचं वादळ, हळूहळू सबंध जगभरात पसरत जात होतं, 'कोरोना' बद्दल समज गैरसमज असताना, फारशी जनजागृती नसताना अचानक महामारी भारतात पसरते, सरकार ठोस पाऊलं उचलतं 20 मार्च 2020ला पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली आणि परिस्थिती बदलली. यावेळी पंतप्रधानांनी नोटाबंदी नाही तर, नागरिकांच्या संचारावर बंदी आणली. याचं कारण महामारी पसरू नये हेच होतं. निर्बंधांची दाहकता ही समाजातल्या प्रत्येक घटकांना भाजून काढणारी ठरली. प्रचंड त्रास, वेदना, शहरं सोडून गावाकडे मिळेल त्यामार्गे धावणारी मंडळी त्यांच्या समस्या, कित्येक लोकांनी खूप काही गमवावं लागलं.. जवळची माणसं, आपापले व्यवसाय... कित्येक मंडळींनी परिस्थितीशी दोन हात केले.
विद्यार्थ्यांची खरी कसोटी परीक्षा लागली होती. सोबतच एकत्र येऊन महामारीचा सामना देखील केलाय, सरकार, सामाजिक संस्था, वैद्यकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन सगळे कामाला लागले होते. कोरोनाची लस सर्वांना मिळेपर्यंत ते तुम्ही आम्ही जगत असलेला आजचा दिवस हे डोळ्यासमोर जेव्हा उभं राहतं तेव्हा अंगावर काटा येतो. नशिबाने आपलं काही बरं वाईट नाही झालेलं याची धन्यता मानत ठेऊन पुन्हा सगळ्यांची गाडी रुळावर आलेली आहे...
हा फ्लॅशबॅक सुरुवातीला सांगायचा अट्टाहास यासाठी होता की, जे काही आपण सर्वांनी जवळून पाहिलंय, अनुभवलं आहे. याच अशा सत्य परिस्थिती लक्षात घेऊन दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) 'इंडिया लॉकडाऊन' (India Lockdown) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलेले आहेत.
'इंडिया लॉकडाऊन' (India Lockdown) हा सिनेमा ZEE5 या या OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झालेला असून, या सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. प्रतीक बब्बर (Prateik Babbar), श्वेता बासू प्रसाद (Shweta Basu Prasad), अहाना कुमरा (Aahana Kumra), प्रकाश बेलावेदी (Prakash Belawadi) सोबत आपली मराठमोळी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सुद्धा फुलमतीच्या भूमिकेत पाहायला मिळाली आहे.
सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा मुंबईत राहणाऱ्या चार वेगवेगळ्या लोकांची कहाणी सांगतो. त्यांच्या वास्तववादी राहणीमानाची गुंफण, कोरोनाचा सामना, साईड इफेक्टस, महामारीची दाहकता यावर भाष्य करतो. यापैकी एक, माधव आणि फुलमती म्हणजे, प्रतीक बब्बर(Prateik Babbar), सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि त्यांच्या दोन मुलांच्या सोबत राहताना दाखवले आहेत. फुलमती घरकाम करून आपल्या परिवाराची आर्थिक गणितं जुळवताना पाहायला मिळाली आहे.
दुसरी म्हणजे रेड लाईट एरियामध्ये काम करणारी मेहरू, मेहरुणीसा म्हणजे श्वेता बासू प्रसाद (Shweta Basu Prasad), तिसरे आहेत नागेशश्वर राव यांनी सिनियर सिटीझनची भूमिका साकारली आहे प्रकाश बेलावेदी (Prakash Belawadi) यांनी..
नागेशश्वर हे मुंबईत राहताना दाखवले असून, त्यांची मुलगी हैदराबादला प्रसूतीसाठी असलेली पाहायला मिळते. तिच्या बाळांतपसाठी नागेशश्वर यांना हैदराबादला जायची इच्छा असलेली दाखवली आहे. शिवाय फुलमती यांच्याकडेच घरकाम करत असलेली पाहायला मिळाली. आणि चौथी गोष्ट आहे प्रेमी युगुल देव सात्विक भाटीया (Satvik Bhatia), आणि त्याची प्रेयसी आणि शेजारी (Aahana Kumra) याची त्यांना त्यांचा वेळ एकमेकांच्या सोबत घालवायचा असतो.
सिनेमा जसा सुरू होतो लॉकडाऊनची सुरुवातीची परिस्थिती दाखवली आहे आणि या चार फॅमिलीज एकमेकांना कनेक्टेड असलेल्या पाहायला मिळतं. कथानक जसजसं पुढं जातं तसं अपेक्षित होतं की, सत्य परिस्थिती, कोरोना महामारीशी लढाई, डॉक्टरांची मेहनत हे सगळं... मात्र, मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांनी दाखवलंच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त वासनाधीन माणसांच्या कहाण्या जबरदस्ती घुसवलेल्या असल्याचं जाणवलं.
कोरोनाच्या परिस्थितीमध्ये माणसाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकताना प्रत्येक कथेत वासना, हवस जबरदस्तीने दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना का दाखवावी वाटली? सिनेमाच्या कथेची ती गरज जास्त होती का? की सत्य वास्तववादी आणि समाजापुढे न आलेल्या गोष्टीचा विसर पडलेला जाणवला. कित्येक गोष्टी होत्या ज्या सिनेमाला चार चाँद लावून गेल्या असत्या. त्यामुळे दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी चांगलं काम प्रेक्षकांच्या समोर आणायची संधी गमावली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
सिनेमात सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने साकारलेली फुलमती असो किंवा वेश्याव्यवसाय करणारी मेहरूची बोल्ड भूमिका, अभिनेत्रींनी उत्तम काम केले आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक प्रकाश बेलावेदी (Prakash Belawadi)ची भूमिका, देवची शेजारी (Aahana Kumra) ही पात्र पूर्णपणे नाटकी वाटली. तसेच, प्रतीक बब्बरने साकारलेली भूमिका अजिबातच त्याला साजेशी नव्हती. चित्रपटात वेशभूषा सगळ्यांचे कपडे पेहराव उत्तम होते, सिनेमाचं चित्रीकरण आणि संगीत छान असलेलं पाहायला मिळालं.
दिग्दर्शकांनी तुमची आमची गोष्ट नक्कीच छान मांडायचा प्रयत्न केला आहे मात्र बरंच काही सुटलं असल्याची जाणीव होते.. मी या सिनेमाला देतोय 2 स्टार...