New Year 2023 : पूर्वी जानेवारी वर्षाचा पहिला महिना नव्हता; 'या' महिन्यापासून व्हायची नवीन वर्षाची सुरुवात
New Year 2023 : नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारीपासून नाही तर मार्च महिन्यापासून सुरु व्हायचे.
New Year 2023 : आज 1 जानेवारी. आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नवीन वर्ष नेहमीच 1 जानेवारीला साजरे केले जात नाही. अनेक वर्षांपूर्वी नवीन वर्षाची सुरुवात जानेवारी व्यतिरिक्त वेगळ्या महिन्यापासून सुरु व्हायची. त्यानंतर हळूहळू कॅलेंडरमध्ये बदल होत गेले आणि 1 जानेवारीपासून नवीन वर्ष साजरे केले जाऊ लागले. तर, नवीन वर्षाची सुरुवात नेमकी कोणत्या महिन्यापासून झाली हे या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊयात नवीन वर्षाचा रंजक इतिहास.
मार्चपासून सुरु व्हायचे नवीन वर्ष
1 जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात ही 15 ऑक्टोबर 1582 पासून सुरु झाली. त्याआधी नवीन वर्ष मार्च महिन्यापासून सुरु व्हायचे. नंतर रोमचा राजा नुमा पॉम्पिलस याने रोमन कॅलेंडरमध्ये आवश्यक बदल केले आणि जानेवारी महिन्याचा समावेश कॅलेंडरमध्ये करण्यात आला आणि तो वर्षाचा पहिला महिना मानला गेला. पूर्वी या कॅलेंडरमध्ये मार्चपासून डिसेंबरपर्यंत फक्त 10 महिने असायचे. कारण त्या वेळी वर्षात केवळ 310 दिवसांचा विचार केला जात होता.
जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात कोणी केली?
रोमन शासक ज्युलियस सीझर यांनी 1 जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू केल्याचे सांगितले जाते. ज्युलियस सीझर खगोलशास्त्रज्ञांना भेटले तेव्हा त्यांना समजले की पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवस आणि सहा तासांत फिरते. हे लक्षात घेऊन वर्षात 12 महिने आणि 310 ऐवजी 365 दिवस करण्यात आले.
यानंतर, 1582 मध्येच, पोप ग्रेगरी यांना ज्युलियस कॅलेंडरमध्ये लीप वर्षाच्या संदर्भात एक छोटीशी चूक आढळली. त्या वेळी प्रसिद्ध धर्मगुरू संत बेडे यांनी सांगितले की, वर्ष हे 365 दिवस 6 तासांचे नसून 365 दिवस 5 तास 46 सेकंदांचे असते. हे लक्षात घेऊन पुढे रोमन दिनदर्शिकेत बदल करून नवीन दिनदर्शिका तयार करण्यात आली आणि तेव्हापासून 1 जानेवारीपासून नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा सुरू झाली.
आत्ताची नवीन वर्ष साजरा करण्याचे स्वरूपही फार बदलले आहे. अनेकजण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी फटाके फोडतात, पार्टी करतात, केक कापतात तसेच फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर नवीन वर्षाचा आनंद साजरा करतात.
महत्त्वाच्या बातम्या :