Women Health : जीव तुझा भात्यापरी...रोज होई खालीवर...ठिणगीला भीडणारी आकल...बाईपण भारी देवा! केदार शिंदे यांच्या मराठी चित्रपटातील महिलांच्या जीवनावर आधारित हे गाणं अवघ्या महाराष्ट्रभर गाजलं. या गाण्याचे बोल जर तुम्ही ऐकले तर स्त्रीजीवनाबद्दल खोलवर सांगण्यात आले आहे. तसं पाहायला गेलं तर आज या व्यस्त जीवनात प्रत्येकजण तणावाचा सामना करत आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का? ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आढळते? हो हे खरंय.. नोकरदार महिलांना ऑफिस तसेच घरातील जबाबदाऱ्यांमुळे ताण येतो, तर गृहिणी असलेल्या महिलांना देखील अनेक प्रकारे ताण येतो, ज्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या महिलांना त्रास देतात. पुरुषांपेक्षा महिला अधिक तणावाखाली का राहतात? सर्वेक्षणात काय म्हटलंय? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊया...
कोणत्या समस्या महिलांना त्रास देतात?
एका सर्वेक्षणानुसार पुरुषांपेक्षा महिला अधिक तणावाखाली असतात. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. एकाच वेळी अनेक भूमिका बजावण्याची इच्छाशक्ती, शारिरीक संघर्ष, आरोग्याच्या अनेक समस्यांनी त्रस्त, कुटुंब एकत्र असतानाही एकटे राहण्याची भावना, कामाचा ताण, घरातील कामाचा समतोल अशा अनेक समस्या पुरुषांच्या तुलनेत स्त्रीला भेडसावतात. या लेखात त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मल्टी टास्किंग - दडपण घेऊ नका
अनेक महिला एकाच वेळी अनेक गोष्टी करण्यास सक्षम असतात, मग काही स्वेच्छेने करतात किंवा काही सक्तीने करतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. याला सामोरे जाण्यासाठी महिलांनी त्यांच्या सर्व कामाच्या याद्या विविध तासांमध्ये विभागून घ्याव्यात, प्राधान्यक्रमानुसार काम करावे आणि मध्येच ब्रेक घेत राहावे. यादीतील सर्व कामं पूर्ण करण्याचे दडपण वाटू नये. काही काम झाले नाही, तरी कामाचा ताण आणि आरोग्याला प्राधान्य न दिल्याने अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.
डिजिटल ओव्हरलोड - सोशल मीडियापासून ब्रेक घेत राहा
अनेक स्त्रिया सोशल मीडियावर सक्रिय राहतात आणि त्यांच्या आयुष्याची तुलना इतरांच्या आनंदी जीवनाशी करून विनाकारण दुःखी होतात, ज्यामुळे तणाव वाढतो. हा डिजिटल ओव्हरलोड कमी झाला पाहिजे आणि सोशल मीडियापासून ब्रेक घेऊन डिजिटल डिटॉक्स करत राहायला हवे.
एकाच ठिकाणी काम नको - घराबाहेर पडून ताजी हवा घ्या
अनेक महिला ज्या गृहिणी असतात, त्या एकाच ठिकाणी काम करताना तणाव जाणवू लागतात. त्यामुळे घराबाहेर पडून ताजी हवा घेतली पाहिजे, त्यामुळे वातावरणात बदल होतो, मूड फ्रेश होतो आणि तणाव कमी होतो.
छंद किंवा आवड जोपासण्याची संधी मिळत नाही
अनेक महिला दिनचर्येत अडकून रात्रंदिवस मशीनप्रमाणे काम करतात. यामुळे, त्यांना काहीतरी वेगळं करण्याची, त्यांचा छंद किंवा आवड जोपासण्याची संधी मिळत नाही. यामुळे मानसिक शांती मिळत नाही, ज्यामुळे कंटाळवाणा आणि थकवणारी दिनचर्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते. त्यामुळे एखादी गोष्ट कलात्मक किंवा रचनात्मक पद्धतीने करत राहिली पाहिजे.
महिलांकडून अपेक्षेचं ओझं
महिलांनी प्रत्येक कामात परफेक्ट असणे अपेक्षित असते, ते जगण्याच्या प्रयत्नात महिला स्वत:ला तणावाने भरून घेतात आणि मग निद्रानाश, नैराश्य यासारख्या समस्यांना बळी पडतात. त्यामुळे स्वत:ला परफेक्ट म्हणवण्याच्या स्पर्धेत न अडकणे महत्त्वाचे आहे. आरोग्याला प्राधान्य देताना शक्य तेवढेच काम करा. इतर कामासाठी मोलकरीण ठेवा, जोडीदार किंवा घरातील इतर सदस्यांची मदत घ्या.
हेही वाचा>>>
Women Health : महिलांनो...घरातील जबाबदाऱ्या, काम ठेवा बाजूला! आधी हृदयविकाराच्या झटक्याची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा.. डॉक्टर म्हणतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )