Women Health : रोज रोज तारेवरची कसरत... एकीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्या..दुसरीकडे मुलांचे संगोपन, नोकरीचा ताण, अशा सर्व गोष्टींचा समतोल राखण्यात महिलांचे संपूर्ण आयुष्य निघून जाते, या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं झेलत असताना अनेक महिला स्वत:कडे लक्ष द्यायला विसरतात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असं समोर आलंय की, मेनोपॉजच्या काळात जाणाऱ्या महिलांच्या हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. संशोधकांना असे आढळून आलंय की, या काळात महिलांच्या लिपिड प्रोफाइलमध्ये असे बदल होतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. हृदयविकार ही केवळ पुरुषांची समस्या आहे हा समज आता जुना झाला आहे. स्त्रियांमध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 40 टक्के मृत्यू हा हृदयविकारामुळे होतो, ज्यामुळे स्त्रियांच्या मृत्यूचे हे प्रमुख कारण बनते. 



मेनोपॉजनंतर हृदयविकाराचा धोका का वाढतो?


संशोधकांच्या मते, मेनोपॉजनंतर महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो कारण या काळात त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साउथवेस्टर्न मेडिकल सेंटर, यूएस. 2010 मध्ये झालेल्या एका अभ्यासाच्या लेखिका डॉ. स्टेफनी मोरेनो यांच्या मते, "मेनोपॉज दरम्यान आणि नंतर एलडीएल (खराब कोलेस्टेरॉल) वाढणे आणि एचडीएल (चांगले कोलेस्ट्रॉल) कमी होणे दिसून येते. या स्थितीमुळे हृदयविकाराचा धोका अधिक असतो, ज्यामध्ये कोरोनरी आर्टरी डिजीजसारख्या समस्यांचा समावेश होतो.


 


लिपिड प्रोफाइलमधील बदल


या संशोधनात एकूण 1,246 सहभागींनी भाग घेतला आणि न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनान्स (NMR) तंत्रज्ञान वापरून महिलांच्या लिपिड प्रोफाइलची तपासणी करण्यात आली. त्यात संशोधकांना असे आढळले की, रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या लिपोप्रोटीन प्रोफाइलमध्ये लक्षणीय आणि प्रतिकूल बदल झाले आहेत, त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे LDL कणांमध्ये वाढ," 


 


संशोधनाचे निष्कर्ष आणि भविष्यातील दिशा


संशोधकांचा असा विश्वास आहे की, या निष्कर्षांमुळे रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉजनंतर स्त्रियांना हृदयविकाराचा धोका का वाढतो आणि आधीच्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे का हे समजण्यास मदत होऊ शकते. 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत यूकेमध्ये होणाऱ्या युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी (ESC) काँग्रेस 2024 च्या आगामी बैठकीत हे संशोधन सादर केले जाणार आहे.


 


महिलांनो... हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष द्या


स्त्रियांनी रजोनिवृत्ती दरम्यान आणि नंतर त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून हृदयविकाराचा धोका कमी करता येतो. वेळीच योग्य पावले उचलून हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकतो याचा पुरावा हे संशोधन आहे.


 


हेही वाचा>>>


Women Health : गरोदर असताना महिलांना हृदयविकार होऊ शकतो? काय काळजी घ्याल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )