Women Health : आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जणांच्या सवयींचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत. आजकाल महिलाही बदलत्या काळानुसार मद्यपान किंवा धूम्रपान करताना दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का? त्यांची ही सवय त्यांच्या आरोग्यावर परिणाम तर करतेच, सोबत त्यांच्या मुलांच्याही आरोग्यावर गंभीर परिणाम करते. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार धूम्रपान करणाऱ्या महिलांच्या मुलांची फुफ्फुसं लहान असतात. यामुळे लहानपणीच मुलांना दमा होण्याची शक्यता असते. सिगारेट, बिडी, हुक्का आणि ई-सिगारेट यांसारख्या सर्व प्रकारच्या धूम्रपानामुळे मुलांच्या शरीराला हानी पोहोचते, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आणखीही काही धोके आहेत, ते जाणून घ्या...



केवळ फुफ्फुसच नाही, तर संपूर्ण शरीराचे नुकसान होते


WHO च्या रिपोर्टनुसार, धुम्रपानाचा परिणाम फक्त फुफ्फुसापुरता मर्यादित नसून संपूर्ण शरीरावर होतो. गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करताना धूम्रपान करणाऱ्या महिलांच्या मुलांना आयुष्यभर फुफ्फुसाच्या आणि शारीरिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या प्रकारच्या मुलांमध्ये शारिरीक क्षमता कमी असते आणि त्यांना श्वसनाचे आजार होण्याचा धोका जास्त असतो.


 


उपचार करण्यात अडचण


पौगंडावस्थेतील आणि प्रौढावस्थेमध्ये धूम्रपानामुळे औषधाचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे दम्याचा उपचार करणे कठीण होते. धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांमध्ये दम्याचा उपचार अधिक आव्हानात्मक असू शकतो.


 


धूम्रपानाचे परिणाम


"मदर्स अगेन्स्ट वेपिंग" राष्ट्रीय मोहिमेशी संबंधित तज्ज्ञ तसेच प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वरुणा पाठक  यांनी सांगितले की, धूम्रपानाचे परिणाम केवळ गर्भवती महिलांपुरते मर्यादित नाहीत. घरात कोणी धूम्रपान करत असेल, तर लहान मुलांना त्यापासून दूर ठेवावे, कारण त्याचा त्यांच्या फुफ्फुसांवर आणि एकूणच आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.


 


तंबाखू नियंत्रणासाठी समुपदेशनाचे महत्त्व


जिल्हा तंबाखू नियंत्रण संनियंत्रण पथकाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2022 ते मे 2023 दरम्यान 650 लोक समुपदेशनासाठी पोहोचले. यापैकी 77 टक्के पुरुष आणि 23 टक्के महिला होत्या. यावरून तंबाखू नियंत्रणाबाबत जनजागृती वाढत असली तरी अजून म्हणावी तितकी झालेली नाही


 


Phyno चाचणी, श्वसन चाचणी


रिजनल रेस्पिरेटरी इन्स्टिट्यूटमध्ये दम्याचे निदान करण्यासाठी Phyno चाचणीचा वापर केला जातो. ही चाचणी श्वासामध्ये नायट्रिक ऑक्साईड वायूचे प्रमाण मोजते. जर हा वायू श्वासामध्ये जास्त प्रमाणात असेल तर फुफ्फुसात आणि श्वसन नलिकांमध्ये जळजळ होऊ शकते, जे दमा, ऍलर्जी किंवा एक्जिमाचे लक्षण असू शकते. हा अहवाल पाहता धुम्रपान संबंधित जागरूकता, त्याचे धोके समजून घेणे आणि ते कमी करण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे बनवते.


 


 


हेही वाचा>>>


Women Health : गरोदर असताना महिलांना हृदयविकार होऊ शकतो? काय काळजी घ्याल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )