Gudhi Padwa 2022 : शालिवाहन शके अर्थात मराठी कालगणनेनुसार गुढीपाडव्याचा दिवस हा नववर्षदिन असतो. हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. पुराणानुसार, गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. हिंदूकालगणनेत शालिवाहन शक आणि विक्रम संवत या दोन संवताला महत्वाचे स्थान आहे. दैनंदिन जीवनात आपण इंग्रजी तारीख वापरतो, पण सण समारंभ हिंदू तिथी नुसारच साजरे होत असतात, त्यात सुद्धा आपण शालिवाहन शकाचा काळगणने साठी जास्त वापर करतो. दरम्यान, शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाल्याचं म्हटलं जातं. दक्षिण भारतात ही कालगणना आजही वापरात आहे. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी जाणून घेऊया
शालिवाहन शक सातवाहन राजांशी संबंधित
शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले.
शालिवाहनापुढे 'शके' कसे आले?
काही जण म्हणतात की, शालिवाहन शके या कालगणनेतला 'शके' हा शब्द शक राजांशी निगडीत नाहीच, "शक ही कालगणनेची पद्धत आहे. काही लोक त्याचा संबंध शकांशी लावतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, शक हा संवत अशा अर्थाने वापरात असलेला शब्द आहे. विविध शकं म्हणजे कालगणना आहेत. त्यापैकी इसवी सनाच्या 78व्या वर्षी शालिवाहन राजानं सुरू केलेली ही कालगणना आपण मराठी कालगणना म्हणून मानतो, असे सांगण्यात येतो. असं म्हणतात, शालिवाहन शक इसवीसन 78 मध्ये सुरु झाला म्हणजे आजच्या इंग्रजी वर्षातून 78 वजा केले कि शालिवाहन शके मिळतात, म्हणूनच 2014 - 78 = 1936 तर आज शके 1936 सुरु झाला, त्याच प्रमाणे विक्रम संवत हे इसवीसन पूर्वी 57 वर्षे आधी सुरु झाला, म्हणजेच सध्या 2071 विक्रम संवत वर्ष सुरु होणार. दोन्ही हि संवत शक आणि कुशाण यांच्या वरील विजयाचे प्रतिक आहेत.
इसवी सन 78 पासून शालिवाहन शक सुरू झाले
शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.
शक संवत
शक संवताचा आरंभ 3 मार्च 78 रोजी झाला. सम्राट कनिष्काने हे संवत सुरू केले. या दिवशी तो सिंहासनारूढ झाला. कनिष्क हा कुषाण राजा होता. त्याने शकांवर दीर्घकाळ राज्य केले. पण त्याच्या मृत्यूनंतर हे शक संवत म्हणून प्रसिद्ध झाले. याचे कारण म्हणजे कनिष्कानंतर शकांनी बराच काळ सत्ता गाजवली. त्यांनीही हेच संवत शक संवत म्हणून वापरले. त्यामुळे कनिष्क संवतलाच शक संवत म्हटले जाऊ लागले.
विक्रम संवत
विक्रम संवत्सर हा चैत्र कृष्ण प्रतिपदेला सुरू होतो. हा कृष्णपक्ष शुक्लपक्षाच्या आधी येतो. गुजरात आणि महाराष्ट्रात नव्या विक्रम संवत्सराची सुरुवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजे दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी होते. विक्रम संवत्सर हे ग्रेगरियन म्हणजे इंग्रजी सनाच्या आकड्यापेक्षा 56ने अधिक असते. म्हणजेच इ.स. 2014 हे विक्रम संवत 2070 होय. विक्रम संवतच्या उत्पत्ती विषयी हि इतिहासकारांत एकमत नाही, शकांचा एक राजा ओझोझ पहिला त्याने इसविसन पूर्वी 57 व्या वर्षी त्याचा म्हणून एक संवत सुरु केला. त्यालाच पुढे गुप्तवंशीय सम्राट विक्रमादित्य याने शक कुशाणांचा उच्छेद केला तेंव्हा पासून लोक विक्रम संवत म्हणून म्हणू लागले. विक्रम संवत आणि शालिवाहन संवत ह्या दोनही राष्ट्रीय संवताचा संबध भारतीयांनी शक-कुशाणा वर जे विजय मिळवले त्यांच्याच स्मृतीगौरवाशी आहे आणि गुढीपाडवा हे नुसते मराठी नववर्ष नसून समस्त हिंदू नववर्ष आहे.
महत्वाच्या इतर बातम्या
भारतीयांचं Happy New Year! कसं घडलं भारताचं स्वतःच कॅलेंडर?
Gudi Padwa 2022: गुढीपाडव्याविषयीच्या 'या' नवीन गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात
Gudi Padwa Wishes 2022 : गुढीपाडव्याला तुमच्या प्रियजनांना 'या' शुभेच्छा देऊन सणाचा आनंद द्विगुणित करा