Online Banking Fraud In Mumbai: ऑनलाईन व्यवहारासोबत सायबर गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झालीय. ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? हे बँकेकडून सातत्यानं सांगितलं जातं. यातच मुंबईमधून सर्वांची झोप उडवणारी माहिती समोर आलीय. ओटीपी न सांगता संबंधित तरूणीच्या खात्यातून 3.63 लाख रुपये गायब झाले आहेत. एका तोतया बँक अधिकाऱ्यानं कॉल संबंधित तरूणीला केला होता. त्यावेळी त्यानं या महिलेकडं ओटीपी मागितला. परंतु, या  तरूणीनं त्याला कोणतीही माहिती शेअर केली नाही. परंतु, तरीही तिच्या खात्यातून पैसे गायब झाल्याची तिनं पोलिसांत तक्रार दिली आहे. 


फिर्यादी तरूणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून तिचे वडील कापड व्यापारी आहेत. तिचे पंजाब नॅशनल बँकेत बँक खाते आहे. तिचा एअरटेल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे. 29 मार्च रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास तिला दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. दरम्यान, आपण बॅंकेतून बोलत असल्याचं सांगत त्या व्यक्तीनं फिर्यादी तरूणीच्या खात्यासंबंधित संपूर्ण माहिती दिली. तसेच तिच्याकडं ओटीपी मागितला. परंतु, या तरूणीला त्याच्यावर संशय आला आणि तिनं त्याचा फोन बंद केला.


त्यानंतर त्या व्यक्तीनं तिला वारंवार फोन करण्यास सुरुवात केली.  एवढेच नव्हेतर, त्यानं व्हॉट्सअपवर एका वेगळ्या मोबाईल क्रमांकावरून पुन्हा तिला कॉल केला. त्यावेळीही त्यानं तरूणाला ओटीपी मागितला. तेव्हाही तिनं फोन डिस्कनेक्ट केला. मात्र, त्याच दिवशी रात्री आठ वाजताच्या सुमरास या तरूणीला तिच्या खात्यातून 3.63 लाख काढण्यात आल्याचा मॅसेज आला, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.


या घटनेच्या दुसऱ्या दिवशी 30 मार्च रोजी संबंधित महिलेनं तिच्या बॅंकेत जाऊन याबाबत तक्रार केली. त्यानंतर बोरिवली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. ओटीपी न सांगता संबंधित तरूणीच्या खात्यातून पैसे गायब झाल्यानं सर्वांना चिंतेत टाकलं आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली होती. 


हे देखील वाचा-




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha