Travel : चांदोबा..चांदोबा भागलास का.. किंवा इतर चंद्रावरील गाणी आपण लहान मुलांच्या तोंडातून सहज ऐकली असतील. परंतु तुम्हाला माहित आहे का की भारतात असे एक ठिकाण आहे जे चंद्रासारखे दिसते? येथे ना झाडे आहेत, ना जास्त हवा किंवा ना दबाव आहे. यामुळेच याला चंद्रभूमी म्हटले जाते. मात्र ही चंद्राप्रमाणे भासणारी जागा नक्की आहे तरी कुठे? जाणून घ्या


 




छोट्या गावात 'भारताची चंद्रभूमी'


जिथे मानव आज चंद्रावर जाऊन पोहचलाय. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी शोधण्यापासून ते इतर काही गोष्टींचे रहस्य सोडवत आहे, अशात आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका ठिकाणाबद्दल सांगत आहोत. जी 'मून लँड' म्हणून प्रसिद्ध आहे. जिथे गेल्यानंतर तुम्हाला चंद्रावर गेल्याप्रमाणे भासेल, हे ठिकाण लेह-लडाखमध्ये आहे, जे साहसप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. तुम्ही सोशल मीडियावर पेंगॉन्ग लेक, मॅग्नेटिक हिल, लेह पॅलेस आणि चादर ट्रॅकशी संबंधित रील अनेक वेळा पाहिली असतील, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लेह आणि कारगिलमधील एका छोट्या गावात भारताची चंद्रभूमी देखील लपलेली आहे. आहे. लेहपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या लामायुरू गाव असे आहे की, तिथली भूमी चंद्राची आठवण करून देते. याच्याशी संबंधित अतिशय मनोरंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.


 


हे ठिकाण मून लँड म्हणून प्रसिद्ध


लेहपासून 120 किमी अंतरावर असलेले लामायुरू गाव मून लँड म्हणून प्रसिद्ध आहे. यासंबंधित मीडिया रिपोर्टमध्ये एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे की, येथे ना झाडे आहेत, ना जास्त हवा किंवा ना दबाव आहे. यामुळेच याला लडाखची चंद्रभूमी म्हटले जाते.




या चंद्रभूमीला भूवैज्ञानिक महत्त्व


लडाखच्या या चंद्रभूमीला भूवैज्ञानिक महत्त्व आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की हा कोरडा भाग नेहमीच असा नव्हता. असे मानले जाते की 35-40 हजार वर्षांपूर्वी लामायुरूमध्ये एक खूप मोठा तलाव होता, ज्याचे पाणी हळूहळू गायब झाले, परंतु तलावामध्ये जमा होणारी चिकणमाती तशीच राहिली, ज्यामुळे त्यामध्ये भेगा पडल्या. त्यामुळे या ठिकाणाची जमीन आता आपल्याला चंद्र आणि मंगळाची आठवण करून देते.



शास्त्रज्ञांसाठी एक खजिनाच जणू - लामायुरू मठ


असे म्हटले जाते की 11 व्या शतकाच्या सुमारास नारोपा ऋषींनी तलाव काढून येथे मठाची स्थापना केली. आज लामायुरू मठ हे लेह-लडाखमधील सर्वात प्रसिद्ध मठांपैकी एक आहे. हे ठिकाण म्हणजे मंगळ आणि चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणाऱ्या संशोधक किंवा शास्त्रज्ञांसाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. मानवाला मंगळावरही पाणी सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की उपग्रहाकडून मिळालेला डेटा योग्यरित्या समजून घेण्यासाठी, पृथ्वीवरील ही ठिकाणे समजून घेणे आणि संशोधन करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञ असो की पर्यटक, लडाखचा हा मठ सर्वांना आकर्षित करतो आणि चंद्रावर चालण्याचा अनुभवही देतो.




लामायुरू मोनेस्ट्री पोहोचण्यासाठी



लेहपासून लामायुरू 120 किलोमीटर अंतरावर आहे. 
लेह आणि कारगिल या दोन्ही ठिकाणांहून सकाळी 10 ते दुपारी 12 च्या सुमारास बसेस धावतात.
ज्याद्वारे तुम्ही या मठात पोहोचू शकता. 
येथे दरवर्षी युरू कब्ग्यात नावाचा वार्षिक उत्सव देखील असतो, 
जेथे लामांनी केलेले मुखवटा नृत्य आणि निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी देश-विदेशातील अनेक पर्यटक येतात.


 


हेही वाचा>>


Hidden Gems Travel : समुद्रावरील शांततेची अनुभूती.. सोबत गणपती बाप्पाचे सानिध्य! कोकणातील 'हे' अप्रतिम ठिकाण पाहताच भान हरपेल


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )