Hidden Gems Travel : शहराच्या गजबजाटापासून शांततेची अनुभूती.. सोबत गणपती बाप्पाचे सानिध्य.. कोकणातील या ठिकाणी येऊन एक विलक्षण मन:शांती लाभते. या ठिकाणी बरेच पर्यटक आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात सुखद दिलासा मिळावा यासाठी येतात. आज आम्ही तुम्हाला देवभूमी म्हणवल्या जाणाऱ्या कोकणातील अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जिथे गेल्यानंतर तुमचे मन कधी हिरावून जाईल हे तुम्हालाही कळणार नाही... जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल..




महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर असलेला शांत समुद्रकिनारा 


आम्ही ज्या ठिकाणाबद्दल सांगत आहोत ते ठिकाण म्हणजे हेदवी बीच... हा समुद्रकिनारा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर गुहागर या गावात आहे. या ठिकाणी भेट देणारे लोक हे ऐतिहासिक मंदिरांना भेट देण्यासाठी येतात, या सोबतच बरेच लोक इथल्या समुद्रकिनाऱ्याच्या प्रेक्षणीय आणि नयनरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी देखील येतात. हेंदवीतील समुद्रकिनाराही तितकाच प्रसिद्ध आहे. इथला शांत समुद्रकिनारा आणि त्याला लागून असलेले उमामहेश्वराचे देऊळ देखील प्रसिद्ध आहे. पर्यटकांची गर्दी इथं सहसा नसते. त्यामुळे या ठिकाणी शहराच्या गजबजटापासून शांततेची अनुभूती मिळते.






'हेदवी बीचवरील 'बामणघळ' हे मुख्य आकर्षणासाठी प्रसिद्ध '


हेदवी बीच हे त्याच्या मुख्य आकर्षणासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यावर 100 मीटर पुढे गेल्यावर कातळ पठारावर सुमारे 30-35 फूट लांब आणि 2 फूट रुंद अशी घळ दिसते. जिला हेदवीची प्रसिद्ध 'बामणघळ' म्हणतात. ही एक निसर्गाची अद्वितीय निर्मिती असल्याचे म्हटले जाते. नैसर्गिकरीत्या तयार झालेली दरी हे त्याचे मुख्य आकर्षण आहे. या जागेला बामणघळ नाव पडण्यामागे एक आख्यायिका देखील सांगितली जाते. एकदा रात्री इथून एक ब्राह्मण प्रवासी एकटाच प्रवास करत होता. या ठिकाणी एक घळ आहे, याची त्याला कल्पना नव्हती. पाय घसरून तो घळीत पडला आणि जखमी झाला.. प्रचंड लाटांमुळे त्या ठिकाणी जखमी होऊन पडलेला तो ब्राह्मण तिथून बाहेर पडू शकला नाही, अन् त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. तेव्हा पासून या जागेला बामणघळ असं नाव पडलं असे म्हणतात. 




गणेशाचे श्री दशभुज मंदिर - पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठिकाण 


हेदवीतील श्री दशभुज मंदिर ज्यामध्ये पांढऱ्या संगमरवरी बनवलेल्या 10 हातांसह गणेशाची भव्य मूर्ती आहे, हे पर्यटकांमध्ये आणखी एक लोकप्रिय ठिकाण आहे. तिथून साधारणपणे दोन किमी पश्चिमेला असलेला तिथला समुद्रकिनाराही तितकाच प्रसिद्ध आहे. हेदवी बीचपासून गणपतीपुळे सुमारे एक तासाच्या अंतरावर आहे. हे ठिकाणा लोकप्रिय गणपती मंदिर आणि आकर्षक समुद्रकिनारा यासाठी ओळखले जाते. गुहागरहून तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. गुहागरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जयगड किल्ल्यापर्यंत फेरी राइड आणि तिथून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनवेल लाइटहाऊसला तुम्ही भेट देऊ शकता. उमामहेश्वराचे मंदिर आणि श्री वेळणेश्वर मंदिर ही पाहण्यासारखी इतर काही सुंदर मंदिरे आहेत.



भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ


निसरडे रस्ते आणि उंच लाटांमुळे पावसाळ्यात भेट देणे योग्य नाही, तर उन्हाळ्यात भेट देणे सोयीचे नसते. त्यामुळे सर्वोत्तम पर्याय म्हणजे पावसाळ्यानंतर लगेचच, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वी, म्हणजे मार्च. या काळात तुम्ही उत्तम हवामानाचा आनंद घेऊ शकता.


 


या ठिकाणी कसे पोहचायचे?


हेदवीला जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पुणे, मुंबई आणि इतर प्रमुख शहरांदरम्यान धावणारी बस सेवा निवडणे. बस हा एक चांगला पर्याय असू शकतो, कारण हेदवीकडे जाणाऱ्या अनेक राज्य परिवहन बसेस उपलब्घ आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे 300 किलोमीटर अंतरावर आहे, तेथून तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी कॅब भाड्याने घेऊ शकता. कोकण रेल्वे मार्गावर काही गाड्या आहेत, हेदवी बीचपासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिपळूण या प्रमुख स्थानकापर्यंत पोहोचतात, तिथून तुम्ही कॅब किंवा जीपने जाऊ शकता.


 


राहण्याची सोय


या ठिकाणी राहण्याची सोय चांगली आहे, तसेच ती तुमच्या बजेटमध्ये बसू शकतील. विविध रिसॉर्ट्स, किनारा बीच हाऊसेस येथे उपलब्ध आहे.


 


जोडीदार किंवा कुटुंबासोबत वेळ घालण्यासाठी सर्वोत्तम पर्याय


हेदवी बीच हे पर्यटन आणि तीर्थयात्रेचे सर्वोत्तम संयोजन असू शकते आणि शांततापूर्ण वातावरणात आपल्या प्रियजनांसोबत किंवा एकट्याने वेळ घालवण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.


 


हेही वाचा>>


 Hidden Gems Travel : फॉरेनचा समुद्र पडेल फिका! महाराष्ट्रातील सर्वात शांत, भारी 'असा' समुद्र, निसर्गसौंदर्य म्हणजे स्वर्गसुखच जणू..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )