Health Tips : राज्यात उष्णतेचं प्रमाण वाढलं आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात याचा परिणाम मोठया प्रमाणात जाणवत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तापमान सरासरीपेक्षा अधिक आणि 40 अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे बऱ्याच आजारांचं प्रमाण वाढतं. उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाचा जाणवणारा आजार म्हणजे उष्माघात (हिट स्ट्रोक). खूप वेळ उन्हात काम केल्याने शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. उष्माघात म्हणजे काय? या संदर्भात अधिक माहिती 'डॉक्टर टिप्स' (Doctor Tips) च्या माध्यमातून जाणून घेऊयात.
उष्माघात म्हणजे काय?
या संदर्भात डॉ. आनंद काकानी, (न्यूरोसर्जन, रेडियंट हॉस्पिटल, अमरावती) म्हणतात की, वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उद्भवणारा गंभीर आजार म्हणजे उष्माघात. आपल्या शरीराचे सर्वसाधारण तापमान 37 अंश सेल्सिअस असते. हे तापमान खूप वाढल्याने किंवा कमी झाल्याने मेंदूवर, रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतात.
उष्माघाताचे मुख्य प्रकार कोणते?
- हीट रॅशेस- घामोळ्या येणे.
- हीट क्रॅम्पस- स्नायूंमध्ये चमक, लचक भरणे.
- चक्कर/बेशुद्धी- खूप घाम येऊन शरीरातील पाणी आणि क्षार कमी झाल्याने रक्तदाब कमी होऊन चक्कर येणे.
- ऱ्हॅब्डोमायोलायसिस- तीव्र उन्हात सतत काम करत राहिल्याने आणि आवश्यक पाणी न प्यायल्याने, स्नायूंच्या पेशी नष्ट होऊन त्यांचे विघटन होऊन ते मृत होतात. परिणामत: हृदयाचे स्पंदन अनियमित होते, मूत्रपिंडांचे कार्य मंदावते.
उष्माघाताची लक्षणे कोणती?
उष्माघातामध्ये थकवा, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे ही सुरुवातीची लक्षणे जाणवू लागतात. या लक्षणांवर वेळीच उपचार केले नाही तर, त्वचा कोरडी पडते, रक्तदाब वाढणे. मानसिक नैराश्य वाढणे, शरीराचं तापमान वाढणे, बेशुद्ध वाटणे.
उन्हाळ्यात उष्माघात कसा टाळावा?
- दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान बाहेर जाणं टाळा.
- घरातून बाहेर पडताना गॉगल, कॅप, अंग झाकणारे कपडे, स्कार्फ वापरा.
- उन्हाळ्यात सुती कपड्यांचा वापर करा.
- हायड्रेशन नीट ठेवणं गरजेचं आहे. दिवसातून कमीत कमी अडीच ते तीन लीटर पाणी प्यावे.
- पाण्याव्यतिरिक्त तुम्ही ज्यूस देखील सेवन करू शकता. जसे की, कलिंगड ज्यूस, ताक, नारळ पाणी इ.
पाहा व्हिडीओ :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :