Summer Health Tips : उन्हाळा (Summer Season)जवळ येताच अनेक आजारही डोकावू लागतात. यंदा फेब्रुवारी महिन्यातच देशातील अनेक राज्यांमध्ये वेळेआधीच उन्हाळा सुरू झाला आहे. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असून, त्यामुळे आजार वाढू लागले आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी तापमान वाढू लागलं आहे. साधारणत: एप्रिलपासून सुरू होणारा उन्हाळा यावेळी लवकर सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत तुमची प्रतिकारशक्ती मजबूत राहिली तर तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. चला तर मग जाणून घेऊया इम्युनिटी मजबूत करण्याच्या खास टिप्स कोणत्या आहेत.
तापमान वाढल्याने आजार वाढतील
आपल्या देशात फेब्रुवारी-मार्च महिन्यात वसंत ऋतु असतो. या ऋतूत फारशी थंड किंवा उष्णही नसते. तापमानात हळूहळू वाढ होत असल्याने, आपले शरीर त्यानुसार स्वतःला अनुकूल करते. परंतु जेव्हा तापमानात अचानक वाढ होते, तेव्हा अनेक आजारांचं प्रमाणदेखील वाढतं. जुलाब, पोटदुखी, सर्दी आणि विषाणूजन्य आजार यामुळे पसरू लागतात.
'या' आजारांचं वाढतं प्रमाण
गेल्या दोन-तीन दिवसांपासून भारतात व्हायरल फिव्हरच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. अचानक उष्मा वाढल्याने विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी प्रत्येक चौथा रुग्ण सर्दी, तापाने त्रस्त आहे. श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. डोकेदुखी, रक्तदाबासोबत नाकातून रक्त येण्याची समस्याही आहे. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे लहान मुलं आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले लोक या आजारांना बळी पडत आहेत.
स्वतःची 'अशी' घ्या काळजी
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या ऋतूत आजारांपासून दूर राहायचे असेल, तर सर्वप्रथम उन्हात अचानक घराबाहेर पडणे टाळा. रात्री गरम झाल्यावर पंख्याचा वेग कमी ठेवा. हलके उबदार किंवा पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. आहार योग्य ठेवा. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. हंगामी फळांचे सेवन करा. शक्यतो टरबूज, संत्री खा. जेवणात सॅलड असणे आवश्यक आहे. काकडी, हिरव्या भाज्यांचे सेवन करा. दही खाणे टाळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :