Ram Navami 2024 : यंदाच्या रामनवमीची (Ram Navami) जगभरातल्या रामभक्तांना प्रतीक्षा आहे. 500 वर्षांनी प्रभू श्रीराम आपल्या जन्मभूमीत विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी असणार आहे. त्यामुळे मनी ध्यानी रामाचा (Lord Ram) जप करत अयोध्येमध्ये (Ayodhya) येण्यासाठी प्रत्येक रामभक्त आतुर झाले आहेत. 


रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक 


यंदाच्या रामनवमीचं सगळ्यात मोठं आकर्षण असेल रामलल्लाच्या मस्तकी होणारा सूर्यतिलक अर्थात सूर्य किरणांचा अभिषेक. रामनवमीच्या दिवशी, मध्यान्ही, दुपारी 12 वाजता, साधारणपणे चार मिनिटं रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे. राम लल्लाच्या कपाळी होणारा हा गोलाकार सूर्याभिषेक 75 एमएम व्यासाचा असेल. या अभिषेकासाठी गेले काही दिवस रुडकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेचे वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत होते.  


रामजन्माच्या दिवशी सूर्यकिरणांनी रामलल्लाचा अभिषेक व्हावा अशी इच्छा मंदिर निर्माणाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली होती. त्यामुळे मंदिर उभारताना या अभिषेकासाठी बांधकाम तज्ज्ञांनी विशेष रचना केली. 


आपल्यापैकी अनेकांना कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात होणारा किरणोत्सव परिचीत आहे. मावळतीची किरणं मंदिराच्या पश्चिम दरवाजातून येत देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत अभिषेक करतात. आजवर अनेकदा आपण हा किरणोत्सव पाहिला आहे आणि अनुभवला आहे. तसाच काहीसा अद्भूत अनुभव अयोध्येच्या राम मंदिरात रामनवमीच्या दिवशी भक्तांना घेता येणारा आहे.  


पण अयोध्येतल्या राम मंदिरातला किरणोत्सव त्यापेक्षा थोडासा वेगळा असेल. अंबाबाईच्या गाभाऱ्यात पश्चिम दरवाज्यातून मावळतीची किरणं देवीला सूर्यकिरणांचा अभिषेक करतात. पण, अयोध्येच्या मंदिरात अंबाबाईच्या मंदिराप्रमाणे कोणत्याही दरवाज्यातून किरणं येणार नाहीत तर ती घुमटातून येतील. कारण भगवान रामाचा जन्म मध्यान्हाची वेळी झाला. यावेळी सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो. त्यामुळे मंदिरात जिथे रामलल्ला विराजमान आहेत तिथल्या घुमटावर गवाक्षासारखी रचना करण्यात आली आहे आणि याच गवाक्षातून एका विशेष सिस्टिमच्या माध्यमातून मध्यान्हीची किरणं गाभाऱ्यात येत रामलल्लाचं तेज वाढवतील.


अशा पद्धतीने होणार रामलल्लावर अभिषेक


घुमटाच्या गवाक्षातून येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवण्यासाठी ऑप्टोमेकॅनिकल सिस्टिमचा आधार घेतला गेला आहे. या सिस्टिममध्ये अभिषेकासाठी दोन आरसे, एक पितळेचा पाईप आणि तीन लेन्सेस सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यातील सगळ्यात मोठी लेन्स मंदिराच्या छतावर बसवली गेली आहे. रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणं छतावरच्या रिफ्लेक्टवर पडतील. तिथून ही किरणं पहिल्या आरशावर परावर्तीत केली जातील. आणि मग पितळेच्या पाईपमधल्या पुढच्या दोन लेन्समधून प्रवास करत ही किरणं पोहोचतील थेट गाभाऱ्यात रामलल्ला समोर बसवलेल्या दर्पणापर्यंत. हा आरसा रामलल्लापासून साठ अंशांच्या कोनात ठेवला गेला आहे. जेणेकरुन या किरणांचा अभिषेक थेट रामाच्या मस्तकी होऊ शकेल. 


भाविकांसाठी 100 एलईडी स्क्रीन 


रामलल्लावर होणाऱ्या सूर्यकिरणांच्या अभिषेकाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. तर अयोध्येतल्या भाविकांना हा सोहळा पाहता यावा यासाठी 100 एलईडी स्क्रीन लावले जातील. रामनवमीच्या दिवशी संपूर्ण मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली जाणार आहे. साधाराणपणे 10 ते 15 लाख भाविक दर्शनाला येतील असाही अंदाज लावण्यात येतोय. राम मंदिर पूर्णत्वास येणं, रामलल्लाला त्यांच्या जन्मस्थानी विराजमान होणं ही शेकडो वर्षांची राम भक्तांची इच्छा पूर्ण झाल्याने यंदाची रामनवमी प्रचंड जल्लोषात आणि भक्ती रंगात रंगलेली असेल यात शंकाच नाही.


महत्त्वाच्या बातम्या : 


Chaitra Navratri 2024 : कृष्ण पती म्हणून प्राप्त व्हावा यासाठी गोपींनी केली कात्यायनीची पूजा; 51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या मंदिराची वाचा रंजक कथा