Gudi Padwa 2024 : हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2024) सणापासून होते. यंदा उद्या, म्हणजेच 9 एप्रिल 2024 रोजी, मंगळवारी नवीन हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी सकाळी सर्व घरांवर गुढ्या उभारल्या जातात. नवीन वर्षाची सुरुवात यशाने व्हावी, यशाची गुढी उंचच राहावी, अशी इच्छा या दिवशी व्यक्त केली जाते. या दिवशी विधीवत पद्धतीने गुढी उभारणं आणि उतरवणं महत्त्वाचं असतं. गुढी कशी उभारावी हे आपण पाहिलंच, आता ती उतरवायची कशी? जाणून घेऊया.


गुढी कधी उतरावी?


गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी गुढी उभारलेली असते, त्याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी गुढी उतरवायची असते. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताची वेळ ही सायंकाळी 06 वाजून 54 मिनिटं आहे, त्यामुळे त्याआधीच तुम्हाला गुढी उतरावी लागणार आहे. सकाळी गुढी उभारताना आपण ज्या प्रकारे गुढीची पूजा करतो, तशाच प्रकारची विधिवत पूजा गुढी उतरवताना करायची असते. 


गुढी कशी उतरावी?


गुढी उतरवताना आरतीचं ताट करुन घ्यावं. ताटात गंध, फुलं,अक्षता, हळदी-कुंकू, निरांजन लावून घ्यायचं आणि उदबत्ती लावायची. गुढी उतरण्याआधी गुढीची पूजा करुन घ्यावी. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू, फुलं वाहून गुढी उतरवली जाते. गुढी उतरवण्याच्या पायऱ्या सविस्तर जाणून घेऊया.



  • सर्वप्रथम गुढीला कुंकू लावा.

  • त्यानंतर गुढीला धूप-दीप दाखवा, अगरबत्ती लावा आणि आरती ओवाळा.

  • यानंतर गुढीला गोडाचा नैवेद्या दाखवावा. गुढी उतरवताना तुम्ही साखरेचा नैवेद्यही दाखवू शकता.

  • यानंतर गुढीला नमस्कार करा आणि गुढी उतरवा.


गुढी उतरवल्यानंतर गुढीच्या साहित्याचं काय करावं?


गुढी खाली उतरल्यानंतर त्याचे सर्व साहित्य योग्य पद्धतीने हाताळलं जाणं गरजेचं आहे. गुढीला वापरण्यात आलेली कडूलिंबाची पानं आणि हार तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता. जवळपास असलेल्या नदी किंवा तलावात तुम्ही ते विसर्जित करू शकता. कडुलिंब तुम्ही धान्यामध्ये देखील मिसळू शकता. त्यानंतर साखरेच्या गाठींची माळ प्रसाद म्हणून खाल्ली जाते. गुढीला वापरण्यात आलेला कलश तांब्या देव्हाऱ्यात किंवा योग्य ठिकाणी ठेवावा, नंतर पूजेसाठी पुन्हा तुम्ही तो वापरू शकता.


गुढीसाठी वापरलेली साडी किंवा ब्लाऊज पिस घरातील स्त्रिया वापरू शकतात. गुढीसाठी वापरलेले वस्त्र छोटे असेल, तर ते मंदिरात दान करू शकता. गुढीसाठी वापरलेली काठी स्वच्छ धुवून पुसून घरात वापरू शकता. रांगोळी वाहत्या पाण्यात सोडावी आणि निर्माल्य योग्य ठिकाणी विसर्जित करावं. तर गुढीजवळ ठेवलेला नैवेद्य गायीला अर्पण करावा. 


हेही वाचा:


Gudi Padwa 2024 : गुढी कशी उभारावी? गुढी पूजनात कोणतं साहित्य वापरावं? जाणून घ्या अचूक माहिती