Navratri 2024 Travel : भारतात अशी अनेक मंदिरं आहेत, ज्यांना चमत्कारी किंवा रहस्यमयी म्हटले जाते, अनेक भाविकांची त्याठिकाणी प्रचंड श्रद्धा असते. सध्या नवरात्रीनिमित्त देशात उत्साहाचं वातावरण आहे, देवीचं आगमन लवकरच होणार असल्याने सगळीकडे जोरात तयारी सुरू आहे, कोणाकडे घटस्थापना, कोणाकडे देवीचा जागर, आरत्या, भजन केले जाते, तर काही जण नवरात्रौत्सव निमित्त देवीच्या विविध मंदिरांना भेट देण्यासाठी जातात. आज आपण अशाच एका देवीच्या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे नतमस्तक होताच सर्व संकटांपासून मिळते मुक्ती! काय आहे या देवीची महती? भाविकांची श्रद्धा काय? जाणून घ्या...
संकटांपासून मुक्ती देणारी देवी!
आपण ज्या देवीबद्दल सांगणार आहोत, ती देवी संकटा देवी नावाने प्रचलित आहे, हिंदू धर्मातील ही एक प्रसिद्ध देवी आहे, जिला संकटांपासून मुक्ती देणारी देवी मानली जाते. तिच्या नावाप्रमाणे जो भक्त मातेची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याचे सर्व संकट दूर होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. या मंदिराचे महत्त्व काय? या संकट मंदिराबद्दल सविस्तर जाणून घ्या.
भगवान भोलेनाथांनी स्वत: केली देवीची पूजा?
धार्मिक मान्यतेनुसार, गंगा घाटाच्या काठावर वसलेले देवी संकट मंदिर हे सिद्धपीठ आहे. येथील देवीची मूर्ती अप्रतिम आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा देवी सतीने आत्मदहन केले तेव्हा भगवान शिव खूप अस्वस्थ झाले. त्यानंतर भगवान भोलेनाथांनी स्वत: देवी संकटाची पूजा केली. यानंतर त्यांना देवी पार्वतीची साथ मिळाली. एवढेच नाही तर पांडव वनवासात असताना त्यांनी काशीत येऊन देवी संकटाची भव्य मूर्ती बसवली होती. अन्नपाणी न घेता एका पायावर उभे राहून पाच भावांनी तिची पूजा केली होती, असे सांगितले जाते. यानंतर देवी संकटाने प्रकट होऊन आशीर्वाद दिला की, गाईची सेवा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. यानंतर महाभारत युद्धात पांडवांनी कौरवांचा पराभव केला. मंदिरात गेल्यावर गाय मातेचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. देवी संकटाचे खऱ्या मनाने स्मरण करून तिची आराधना केल्याने मनुष्य सर्व संकटांपासून मुक्त होतो, असे म्हटले जाते.
नारळ अर्पण केल्याने संकट देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
भाविकांची अशी श्रद्धा आहे की, या संकटा देवीला नारळ आणि चुनरी अर्पण करून ती प्रसन्न होते. जर तुम्ही देवी संकटाची पूजा करणार असाल तर तिच्या शक्तिशाली मंत्रांचा जप करणे शुभ मानले जाते. या मंत्राचा 21 वेळा जप करा. या मंत्रांचा जप केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. यासोबतच सुख, समृद्धी आणि सौभाग्यही वाढते.
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे:
ॐ देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
हेही वाचा>>>
Navratri 2024 Travel: 'जिथे देवीच्या चमत्कारासमोर औरंगजेबालाही घाम फुटला!' दुर्गा देवीचे एक अनोखे मंदिर, रंजक आख्यायिका वाचून व्हाल थक्क
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )