Navratri 2024 Travel : अश्विन शुद्ध पक्ष अंबा बैसली सिंहासनी हो... प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी हो..उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो..!!! देवीच्या आरतीतील हे बोल सर्वांनाच माहित आहेत, याचप्रमाणे हिंदू धर्मात नवरात्रीला अत्यंत महत्त्व आहे, यंदा पंचांगानुसार, शारदीय नवरात्र उत्सवाला 3 ऑक्टोबर दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपासून सुरुवात होत आहे. तसेच 12 ऑक्टोबर 2024 रोजी संपणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीचा जागर केला जातो. हिंदू धर्मात हे दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केले जातात. नवरात्रीत देवीची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात, अशी धारणा आहे. पूजा करण्याव्यतिरिक्त, या दिवसात बरेच लोक देशातील प्रसिद्ध दुर्गा मंदिरांना देखील भेट देतात.


 


देवीच्या 'या' मंदिराची आख्यायिका अवघ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध 


वैष्णो देवी, कामाख्या देवी, नैना देवी किंवा चामुंडा देवी मंदिरांबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती आहे. त्याचप्रमाणे, भारतात असे एक देवीचे मंदिर आहे, जिथली आख्यायिका अवघ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. आम्ही ज्या मंदिराबद्दल सांगत आहोत, ते मंदिर राजस्थानमध्ये जीन माता मंदिराच्या नावाने प्रचलित आहे, हे एक दुर्गा मंदिर आहे, ज्याला भाविक एक चमत्कारी मंदिर म्हणून समजतात. आज आम्ही तुम्हाला जीन माता मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.


 




सुमारे 1200 वर्षांपूर्वीचा इतिहास 


जीन माता मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे. या मंदिराबाबत असे सांगितले जाते की, हे मंदिर सुमारे 1200 वर्षांपूर्वी बांधले गेले होते. हे प्राचीन काळापासून भक्तांचे तीर्थस्थान आहे आणि अनेक वेळा त्याची दुरुस्ती तसेच पुनर्बांधणी करण्यात आली आहे. जीन माता मंदिराच्या इतिहासाबाबत आणखी एक मान्यता अशी आहे की ते 9व्या शतकात बांधले गेले होते. या मंदिराच्या भिंतींवर 9व्या शतकापेक्षा जुने शिलालेख असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात सुमारे आठ शिलालेख आहेत, जे मंदिराच्या सर्वात प्राचीन भागाचा पुरावा मानले जातात.


 




जीन देवी मंदिर संबंधित आख्यायिका


पौराणिक कथेनुसार, जीन मातेचा जन्म चौहान वंशाच्या राजाच्या घरी झाला आणि जीन मातेच्या मोठ्या भावाचे नाव हर्ष होते. हर्ष हा दैवी अवतार मानला जातो असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार, एके दिवशी भाऊ आणि बहिणीमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि जीन माता रागावली, त्यावेळी ती राजस्थानच्या सीकरमध्ये तपश्चर्या करू लागली. भावाने बहिणीचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही देवी जीन राजी झाली नाही. नंतर हळूहळू या ठिकाणी पूजा होऊ लागली आणि ते पवित्र स्थान मानले जाऊ लागले.


 


जेव्हा औरंगजेबाने देवीच्या दरबारात जाऊन क्षमा मागितली...


जीन मातेला चमत्कारिक मंदिर मानले जाते. याबद्दल एक रंजक आख्यायिका अशी की, एके दिवशी औरंगजेबाने आपले सैन्य मंदिर पाडण्यासाठी आणि लुटण्यासाठी पाठवले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी हजारो सैन्य पाहून मातेला रक्षणासाठी आवाहन केले, तेव्हा मातेच्या चमत्कारामुळे मोठ्या मधमाश्या औरंगजेबाच्या सैन्यावर तुटून पडल्या. मधमाशांच्या चाव्यामुळे गंभीर जखमी झाल्याने सर्व सैनिक पळून गेले. या घटनेनंतर औरंगजेब स्वतः आजारी पडल्याचे सांगितले जाते. जेव्हा औरंगजेब खूप आजारी होऊ लागला, तेव्हा त्याने आईच्या दरबारात जाऊन क्षमा मागितली. औरंगजेब बरा झाल्यावर त्याने मंदिरात अखंड दिवा लावला होता असे म्हटले जाते.


 


नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी


हे मंदिर अवघ्या राजस्थानसाठी संरक्षण म्हणून काम करते. नवरात्रीनिमित्त येथे केवळ स्थानिकच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रीच्या विशेष प्रसंगी, जीन देवीचे मंदिर फुलांनी सजवले जाते. अष्टमी आणि नवमी दरम्यान येथे सर्वाधिक गर्दी असते. या विशेष प्रसंगी पहाटे 3 वाजता मंदिराचे दरवाजे उघडतात. नवरात्रीनिमित्त मंदिराभोवती जत्राही भरते.


 





जीन देवी मंदिरात कसे जायचे?


जीन माता मंदिरापर्यंत पोहोचणे खूप सोपे आहे. या मंदिराजवळ सर्वात मोठे जयपूर शहर आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून जयपूर गाठून तुम्ही सहज जीन माता मंदिरात पोहोचू शकता. जयपूरपासून जीन माता मंदिराचे अंतर सुमारे 115 किमी आहे. तुमच्या माहितीसाठी, जीन माता मंदिरापासून खटू श्यामजींचे प्रसिद्ध मंदिर सुमारे 26 किमी अंतरावर आहे. खटू श्यामजी हे भगवान श्रीकृष्णाचे कलियुगी अवतार मानले जातात.


 


हेही वाचा>>>


Navratri 2024 Travel: काय महिमा वर्णू तिचा हो! इथे देवीच्या मूर्तीला चक्क घाम फुटतो, भारतातील अनोखे शक्तीपीठ, नवरात्रीनिमित्त घ्या दर्शन


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )