Ganesh Chaturthi 2023 : अवघ्या महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात दहा दिवसांचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मात्र आज गणेशोत्सवानिमित्त आम्ही तुम्हाला एका गुहेबद्दल सांगत आहोत, जिथे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणेशाचे मूळ शीर एका गुहेत ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. कुठे आहे नेमकी ती गुहा? काय आहे त्याचे रहस्य? जाणून घ्या...



डोंगराच्या आत 90 फूटी गुहा 
आजच्या काळात पाताल भुवनेश्वर हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले आहे. केवळ भारतातील नाही, तर देश, विदेशातील अनेक पर्यटक या गुहेला भेट देण्यासाठी येत असतात. अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या चार धामांचे सुलभ दर्शन या गुहेत होते, असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने शरीराच्या मळापासून केलेल्या मूर्तीत प्राण फुंकले, आणि श्रीगणेशाचा जन्म झाला. यानंतर महादेव शिवशंकरांनी गणपतीवर त्रिशुळाने जोरदार प्रहार केला. यानंतर गणपतीला गजमुख लावण्यात आले, ही रंजक कथा सर्वांनाच माहित आहे, मात्र भारतात अशी एक गुहा आहे, जी डोंगराच्या 90 फूट आत आहे, असे म्हणतात की, भगवान शिवाने गणेशाचे मस्तक ठेवलेली ही गुहा आहे. उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे ही गुहा आहे. ही गुहा पाताळ भुवनेश्वर म्हणून ओळखली जाते. येथे विराजमान असलेली गणेशमूर्ती आदिगणेश म्हणून ओळखली जाते. असे म्हणतात की, या गुहेचा शोध आदि शंकराचार्यांनी 1191 मध्ये लावला होता. स्कंद पुराणातील मानस विभागात याचे वर्णन केले आहे.




 



भगवान शंकर स्वतः करतात रक्षण 


पाताल भुवनेश्वर गुहेत गणपतीचे मूळ शीर ठेवण्यात आले आहे, असे सांगितले जाते. येथे गणपतीची एक मूर्ती आहे, त्यास आदी गणपती म्हटले जाते. येथील मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीचे रक्षण भगवान शंकर स्वतः करतात, अशी मान्यता आहे. पौराणिक संदर्भानुसार, त्रेतायुगातील राजा ऋतुपर्ण याने प्रथम ही गुहा पाहिली होती. तो त्या ठिकाणी गेल्याचे काही दाखले पुराणात मिळतात.


 


 





गुहेत चार युगांचे प्रतीक असलेले चार दगड 
पाताळ भुवनेश्वर गुहेत चार युगांचे प्रतीक असलेले चार दगड आहेत. यातील एक दगड हळूहळू वर येत आहे, तो दगड कलियुगाचे प्रतीक मानले जाते. येथील दगड हजार वर्षांतून एकदा वाढतो. ज्या दिवशी हा दगड भिंतीवर आदळेल त्या दिवशी कलियुगाचा अंत होणार असे म्हणतात. पाताल भुवनेश्वर लेणीबद्दल असे म्हटले जाते की, येथे गणेश आणि शिवासह तेहतीस कोटी देवी-देवतांचा वास आहे. या गुहेत बद्रीनाथ, केदारनाथ आणि अमरनाथचे देखील दर्शन होतात, अशी मान्यता आहे. बद्रीनाथमध्ये दगडी शिल्पे आहेत, ज्यात यम कुबेर, वरुण, लक्ष्मी, गरुड आणि गणेश यांचा समावेश आहे. 




 


गुहेचा शोध कोणी लावला? गुहेबद्दल साक्षात्कार


असे मानले जाते की गुहेत असलेल्या ब्रह्मकमळाची स्थापना भगवान शंकराने केली होती. त्रेतायुगात अयोध्येतील सूर्यवंशी राजा ऋतुपर्ण याने या गुहेचा शोध लावला होता असे म्हणतात. एके दिवशी जंगली हरणाचा पाठलाग करत तो या गुहेत पोहोचला. राजाने गुहेत महादेवासह तेहतीस कोटी देवतांचे दर्शन घेतले होते. अशी मान्यता आहे. पाताल भुवनेश्वर येथील मान्यतेनुसार, आदि गुरू शंकराचार्य प्रथम या स्थानी आले होते, असे सांगितले जाते. इ. स. पूर्व ७२२ च्या दरम्यान शंकराचार्यांना या गुहेबद्दल साक्षात्कार झाला. येथे येऊन त्यांनी तांब्याचे शिवलिंग स्थापन केले, असे सांगितले जाते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या


Ganesh Visarjan 2023: 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणपतीचे विसर्जन का करतात? पौराणिक कथा जाणून घ्या