Ashadhi Wari 2023 : धोतराच्या पायघड्यांनी स्वागत, मेंढ्यांचं रिंगण; तुकोबांचा आजचा मुक्काम सणसरमध्ये तर लोणंदमध्ये ज्ञानोबांचा विसावा...
तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचा इंदापूर तालुक्यात सणसर तालुक्यात आजचा मुक्काम असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणंदमध्ये असणार आहे.
Ashadhi Wari 2023 : जगतगुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटपून सकाळी इंदापूरच्या दिशेने रवाना झाला. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे पालखी सोहळा आल्यानंतर पालखीचे स्वागत धोतराच्या पायघड्या अंतरून करण्यात आले. पालखी सोहळा न्याहारीसाठी विसावला होता. त्यानंतर दुपारी काटेवाडी येथे तुकाराम महाराजांच्या पालखीचे पहिले मेंढ्यांचे रिंगण पार पडलं. त्यानंतर पालखी सोहळ्याचा इंदापूर तालुक्यात सणसर तालुक्यात आजचा मुक्काम असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणंदमध्ये असणार आहे. उद्या सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तरडगावकडे मार्गस्थ होणार आहे.
धोतराच्या पायघड्या घालत पालखीचं स्वागत
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनं काटेवाडीत प्रवेश करताच परीट समाजाच्यावतीनं धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. परीट पायघड्या अशी या परंपरेची ओळख आहे. हा सोहळा भाविकांसाठी खूपच विलक्षण असतो. मग सनई-चौघड्यांनी पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पालखीनं गावात विसावा घेतला. त्यानंतर सणसरच्या दिशेनं पालखी निघताना काटेवाडीच्या मुख्य चौकात मेंढ्यांचं रिंगण पार पडलं. हे रिंगण पार पडण्याआधी तुकारामांच्या पालखीला काही बैलांनी रिंगण घातलं.
रिंगण का घातलं जातं? आख्यायिका काय?
अनेक वर्षांपूर्वी काटेवाडीतील मेंढ्यांवर रोग पसरला होता. त्याच दरम्यान संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीत आली होती. अनेक महिने उपचार करुनही मेंढ्यांवर उपचाराचा काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर मेंढपाळांनी तुकाराम महाराजांकडे साकडं घातलं की मेंढ्यावरील रोग नष्ट होऊ दे. त्यानंतर मेंढपाळांनी पालखी गावात आल्यावर या मेढ्यांचं रिंगण तुकाराम महाराजांच्या पालखीला घातलं त्यानंतर मेंढ्यांची रोगराई कमी झाली किंवा काही मेंढ्यांची रोगराई संपूर्णपणे नष्ट झाली, त्यामुळे दरवर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीला दरवर्षी मेंढ्यांचं रिंगण घातलं जातं, असं मेंढपाळांनी सांगितलं आहे.
1000 मेंढ्यांचं रिंगण..
गावात धनगर समाज जास्त प्रमाणात आहे. या समाजातील सगळे लोक आपल्याकडे असणाऱ्या मेंढ्या रिंगणासाठी घेऊन येतात. या सोहळ्यात साधारण 1000 मेंढ्या या रिंगणासाठी आणल्या जातात. आपल्यावर येणारं संकट टळो आणि अडीअडचा सामना करण्यासाठी बळ मिळावं यासाठी मेंढपाळ रिंगणासाठी आपल्या मेंढ्या घेऊन येत असतात आणि रथाला तीन किंवा पाच फेऱ्या मारल्या जातात. हा सोहळा पाहण्यासाठी विलोभनीय असतो. दरवर्षी रिंगण पाहण्यासाठी गावाजवळील परिसरातील हजारो नागरिक गर्दी करत असतात.