Rainy Season 2022 : हिंदू पंचांगानुसार वर्षभरात येणा-या 27 नक्षत्रांपैकी 9 नक्षत्रं ही पावसाची असतात. ‘नक्षत्रं आणि दरवर्षी त्यांची बदलणारी वाहनं’ ही अत्यंत मजेशीर आणि तितकीच संशोधनात्मक बाब आहे. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी ‘रोहिणी’ नक्षत्रापासून होत असली, तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास हा ‘मृग’ नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. मृगशीर्ष नक्षत्राशी सूर्य आला की भारतात पावसाळा सुरू होतो. शेतकरी या वेळेला ‘मृग लागले’ असे म्हणतात,


‘मृग नक्षत्र’ हे आकाशमंडपातलं वैशिष्टयपूर्ण देखणं असं नक्षत्र मानलं जातं. युगानुयुगांपासून सामान्यत: 7 किंवा 8 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो असे मानले जाते. ‘मृग नक्षत्र आणि पहिल्या पावसाची’ ओढ ही केवळ कवींनाच नाही, तर समस्त भारतीय समाज माणसाला लागलेली असते. 


सामान्यत: 7 किंवा 8 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो. ‘मृग’ हे आकाशमंडपातलं एक विशेष देखणं नक्षत्र. हरिणाचे चार पाय, त्याच्या पोटात शिरलेला बाण आणि लगतच असलेला तेजस्वी व्याध तारा, असा भासणारा हा तारकासमूह मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण रात्रभर आकाशात दिसतो. जूनमध्ये आकाशात मृग नक्षत्र दिसतच नाही, कारण सूर्याच्या सान्निध्यात त्याचं तेज लुप्त होत असतं.


मृगनक्षत्र दिनाचा इतिहास काय?


पावसाच्या प्रत्येक नक्षत्राबरोबर त्याच्या वाहनाचा उल्लेख हा असतोच. प्रत्येक नक्षत्रात पाऊस सारखा पडत नाही, तो कमी-जास्त पडतो. पावसाचं प्रमाण आधीच ठरवता यावं, अशी शेतक-यांची अर्थातच इच्छा असे. म्हणून काही पूर्वीच्या ज्योतिषांनी त्यासाठी काही ठोकताळे बसवले. त्यासाठी सूर्य नक्षत्र कोणत्या वाहनावर बसून येतं, ते शोधण्याचं त्यांनी एक गणित मांडलं. सूर्य नक्षत्रापासून दिवस नक्षत्रापर्यंतची नक्षत्रं ते मोजतात आणि त्या आकड्याला नऊ या संख्येने भागतात. बाकी शून्य आली, तर वाहन हत्ती असतं, बाकी एक आली तर ते वाहन घोडा, बाकी दोन आली तर कोल्हा असतं. तीन आल्यास बेडूक, चार आल्यास मेंढा, पाच आली तर मोर, सहा आली तर उंदीर, सात आली तर म्हैस आणि आठ आली, तर वाहन गाढव असा हा संकेत आहे.


कोकणातला शेतकरी मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वीच शेतीची साधनं बाहेर काढून, शेतीसाठी उपयुक्त असलेल्या साधनसामग्रीची साफसफाई आणि दुरूस्ती करून तयार असतो. जमीन भाजल्याशिवाय ती पिकणार नाही, असा परशुराम-भूमी(कोकण भूमी)ला शाप आहे. त्यामुळे ती आधीच भाजून घेतलेली असते. पहिल्या पावसानंतर नांगरणी-पेरणीची गडबड असते. मराठवाडा-विदर्भ या प्रदेशात पाऊस सुरू होण्यापूर्वीच पेरणी करतात, तिला ‘धुळपेरा’ असं म्हणतात. कितीही कठीण काळ आला, शेतीकाम परवडेनासं झालं, तरी शेतकरी राजा मृग नक्षत्राच्या स्वागतासाठी सज्ज होऊन कामाला लागतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्वाच्या बातम्या :